हॅप्पी बर्थडे पृथ्वी 'बाबा' !

Last Updated: Saturday, March 17, 2012 - 15:27

www.24taas.com, मुंबई

 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे. ‘मिस्टर क्लीन’ अशा प्रतिमेमुळेच चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. सुमारे सव्वा वर्षांपासून आघाडीचं सरकार चालवताना त्यांची नक्कीच कसरत होत आहे.

 

१७ मार्च १९४६ मध्ये जन्म झालेल्या पृथ्वीराज यांच्या घरातच राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण हे ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात होते. जवाहरलाल नेहरुंचे ते सहकारीही होते. तर आई प्रमिलाकाकी चव्हाण या खासदार होत्या.परदेशात उच्चशिक्षण घेवून भारतात परतलेले पृथ्वीराज चव्हाणही साहजिकच राजकारणात ओढले गेले. १९७३ मध्ये ते कॉग्रेसचे प्राथमिक सदस्य झाले. त्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या कराड लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा खासदार तर २००२ आणि २००८ मध्ये राज्यसभेवर ते निवडून गेले. या काळात ते सहा वर्ष पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राची गोडी असल्यानं त्यांच्याकडं ओघानं विज्ञान-तंत्रज्ञान खात्याची स्वतंत्र जबाबदारीही होती. अनेक वर्ष ते विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीचे सदस्यही होते. केंद्रात काहीकाळ त्यांनी वित्तमंत्रालयाचे सल्लागार म्हणून काम केले.

 

अनेक वर्ष राजकारणात असूनही पृथ्वीराजबाबा हे राजकारणी मात्र होऊ शकले नाहीत. राजकारणात त्यांनी कधी आपला कंपू तयार केला नाही. नोव्हेंबर २०१० मध्ये आदर्श सोसायटी घोटाळ्यावरुन अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. जनमानसात काँग्रेसची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी स्वच्छ प्रतिमेचा शोध सुरु झाला. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेल्या पृ्थ्वीराज यांनी राज्याचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून ११ नोव्हेंबर २०१० रोजी पदाची शपथ घेतली.

 

सीएम म्हणून राज्यात परतल्यावर चव्हाण यांना अनेक पातळ्यांवर झगडावं लागतंय. पारदर्शक कारभार देताना आणि मागील राजकारण्यांनी केलेल्या चूका सुधारताना त्यांची दमछाक होतेय तर दुसरीकडे कामं होत नाहीत म्हणून मित्रपक्षातील मंत्र्यांबरोबरच स्वपक्षातील आमदारही त्यांच्या विरोधात प्रचार करतायेत. मात्र सरळमार्गी कामाची आणि जनहीताची एकही फाईल मुख्यमंत्री दरबारी अडत नाही असा अनुभव आहे. आडवाटेने आणि नियम धाब्यावर बसवून काम करण्याची सवय असलेले आमदार त्यामुळेच पृथ्वीराजबाबांच्या नावानं शिमगा करतायेत. त्याला तोंड देत मागील सव्वा वर्षांपासून ते राज्याचा गाडा हाकत आहेत.

 

सीएम पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी दिल्लीत आपले वजन वापरुन राज्यातील काही प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले. यात प्रामुख्यानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीआरझेड नियमावलीत शितिलथा, जैतापूर अणूउर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. यापुढे मुंबईत कोस्टल रिंगरोड, धारावी पूर्नविकास प्रकल्प, घरांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी नियमावली अशी महत्वपूर्ण कामे मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकांची कामे जलद व्हावीत या बाबीही त्यांच्या अजेंड्यावर नेहमी असतात. मात्र उद्दीष्ट डोळ्यासमोर असतानाच पृथ्वीबाबांना विरोधकांबरोबरच स्वकीयांचाही सामना करत कारभार करावा लागणार आहे.

First Published: Saturday, March 17, 2012 - 15:27
comments powered by Disqus