ज्वालामुखीच्या तोंडावर डोंबिवली

डोंबिवली हे शहर भयानक ज्वालामुखीच्या तोंडावर वसलंय, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरालगत असलेल्या दावडी गावातल्या एका भंगार डेपोत केमिकलच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झालाय. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की या टाकीच्या धातूचे तुकडे तब्बल 3 किलोमीटर अंतरापर्यंत फेकले गेले. डोंबिवलीकरांना भोगाव्या लागणा-या दुष्टचक्रावर हा एक विशेष रिपोर्ट..

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 6, 2013, 11:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवली
डोंबिवली हे शहर भयानक ज्वालामुखीच्या तोंडावर वसलंय, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरालगत असलेल्या दावडी गावातल्या एका भंगार डेपोत केमिकलच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झालाय. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की या टाकीच्या धातूचे तुकडे तब्बल 3 किलोमीटर अंतरापर्यंत फेकले गेले. डोंबिवलीकरांना भोगाव्या लागणा-या दुष्टचक्रावर हा एक विशेष रिपोर्ट..
रासायनिक ज्वालामुखीच्या तोंडावर डोंबिवली
जबरदस्त स्फोटाने हादरली डोंबिवली
रासायनिक टाकीच्या स्फोटात तिघांचा बळी
दोन किमी अंतरावरील इमारतींनाही स्फोटाचा हादरा

डोंबिवली एमआयडीसी परिसरातलं दावडी गावातलं हे आहे गायकर कंपाऊंड. एमआयडीसीला लागून असल्यामुळे कल्याण-शीळ रस्त्यावरच्या अनेक गावांमध्ये सध्या अनधिकृत भंगार व्यवसाय बोकाळलाय... त्यापैकीच एक असलेल्या गायकर कंपाऊंडमधील अनधिकृत डेपोत केमिकलच्या जुन्या टाक्या ठेवल्या होत्या. या टाक्यांपैकी एका टाकीचा पत्रा कापण्यासाठी शुक्रवारी सकाळी याठिकाणी वेल्डींगचं काम सुरू होतं. त्यावेळी त्या टाकीतल्या केमिकलचा जबरदस्त स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की दोन किलोमीटर परिसरात या स्फोटाचा हादरा बसला. या स्फोटात तिघेजण जागीच ठार झाले.. स्फोटामुळे इतर भंगार सामानालाही आग लागली आणि ही आग पसरत गेली. अखेरीस 2 तासांनंतर ही आग विझवण्यात आली.

स्फोटाची तीव्रता एवढी होती की स्फोटानंतर या टाकीचा एक तुकडा दुर्घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरच्या रिझन्सी इस्टेट या काँप्लेक्समध्ये उडून पडला. त्या पत्राच्या फटक्याने तिथे एकाचा मृत्यू झाला. तर एक तुकडा तीन किलोमीटरच्या आडीवली गावात एका घराचं छप्पर तोडून आत पडला.सुदैवाने त्याठिकाणी एकाचा जीव वाचला...

डोंबिवलीत दोन फेजेसमध्ये असलेल्या एमआयडीसी परिसरामुळे आधीच डोंबिवली महाराष्ट्रात प्रदुषणाच्या बाबतीत दुस-या क्रमांवर पोहोचलंय. त्यातच या कारखान्यांमुळे आणि अनधिकृत भंगार डेपोंमुळे नव्याच समस्या उभ्या राहिल्यात. विशेष म्हणजे स्फोट झालेल्या ठिकाणापासून मानपाडा पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. तरीही या अनधिकृत डेपोंची माहिती पोलिसांना नव्हती का? आणि होती तर मग कारवाई का झाली नाही? असे प्रश्न डोंबिवलीकर विचारत आहेत. या निमित्ताने प्रदूषण नियंत्रण महामंडळही झोपलं आहे का? असा सवालही केला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ