चीन निघालं चाणाक्ष, भारताची सडली द्राक्षं

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, October 9, 2012 - 18:29

www.24taas.com, नाशिक
बातमी चिनी सफरचंदांची आणि नाशिकच्या द्राक्षांची.... भारत आणि चीनमध्ये सात वर्षांपूर्वी एक निर्यात करार झाला. त्यानुसार चीननं सफरचंद निर्यात करायची आणि भारतानं नाशिकची द्राक्षं निर्यात करायची असं ठरलं. या करारात चीननं चाणाक्षपणा दाखवला पण भारताचे प्रतिनिधी अपयशी ठरले. परिणामी चीनमधून सफरचंद येतात, पण भारताची द्राक्षं मात्र चीनमध्ये पोहोचू शकली नाहीत.... नक्की काय घडलं?

आंबटगोड द्राक्षांवरती नाशिक जिल्ह्याचं अर्थकारण अवलंबून आहे. द्राक्षांमुळे नाशिकचं नाव जागतिक बाजारपेठेत पोहोचलंय. भारताला चीनमध्येही नाशिकच्या द्राक्षांची निर्यात करता यावी, यासाठी सात वर्षांपूर्वी भारत आणि चीन दरम्यान एक करार झाला. या करारानुसार, भारतानं द्राक्षं तर चीननं सफरचंद एकमेकांच्या देशात निर्यात करण्याचं ठरलं. हा करार करताना चाणाक्ष चीननं एक अट घातली. त्यानुसार द्राक्षं निर्यात करताना ती उणे एक अंश तापमान असलेल्या कंटेनरमध्ये ठेवण्यात यावीत, असं ठरलं. महत्त्वाचं म्हणजे असं तंत्रज्ञान असलेले कंटेनर्स भारतात कुठेही उपलब्ध नाहीत. करार करताना भारताच्या प्रतिनिधींना याची माहितीच नव्हती. परिणामी चीनची आतापर्यंत एक लाख २५ हजार मेट्रिक टन सफरचंद भारतात निर्यात झाली. पण या अशक्य अटीमुळे भारताची एक किलो द्राक्षंसुद्धा चीनमध्ये निर्यात होऊ शकली नाहीत.
एकीकडे भारत FDI च्या माध्यमातून इतर देशांसाठी भारताची दारं उघडतंय. पण त्याचवेळी आपल्या देशातल्या उत्पादनं इतर देशात निर्यात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजनांमध्ये म्हणावी तितकी प्रगती होत नाही. आज भारतातले बाजार चीनी वस्तूंनी भरलेत. पण त्याचवेळी केवळ निर्यातीच्या निकषांमध्ये बसणाऱ्या सुविधा नाहीत, त्यामुळे नाशिकमधली तीस ते चाळीस द्राक्षं अक्षरशः सडत आहेत. चीननं सफरचंद पाठवून त्यांचे खिसे भरायला कधीच सुरुवात केलीय, पण परराष्ट्र मंत्रालय, अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि पणन विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे करार होऊनही नाशिकच्या द्राक्षांना अजून चीनपर्यंतचा प्रवास शक्य झालेला नाही.

First Published: Tuesday, October 9, 2012 - 18:29
comments powered by Disqus