रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं भयान वास्तव

राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं वास्तव भयान आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या योजनेचं राज्यात तीनतेरा वाजलेत. कामं करूनही मजुरांना घामाचे पैसेच मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. तर मजुरीचे पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. ठेकेदारांची मनमानी मजुरांच्या जीवावर उठली आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 8, 2014, 05:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा
राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं वास्तव भयान आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या योजनेचं राज्यात तीनतेरा वाजलेत. कामं करूनही मजुरांना घामाचे पैसेच मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. तर मजुरीचे पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. ठेकेदारांची मनमानी मजुरांच्या जीवावर उठली आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट
ग्रामीण भागातल्या रोजी-रोटीची भ्रांत असलेल्या गरिब मजुरांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी सा-या जगासमोर आदर्श ठरेल अशी महात्मा गांधींच्या नावाने रोजगार हमी योजना केंद्र सरकारनं देशभरात राबवली. रोजगार देणारी ही योजना आता मजुरांसाठी जीव घेणारी ठरल्याचं धक्कादायक चित्र बुलढाणा जिल्ह्यात समोर आलंय. कारण ठेकेदारांच्या घोटाळ्यांचा धुमाकूळ इथंही सुरू आहे.
कष्टकरी मजुरांचे लाखो रुपये ठेकेदारांनी परस्पर लाटल्यानं बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात मजुरांवर स्वत:ला संपवण्याची वेळ आलीय. लोणार तालुक्यातले टिटवी हे आदिवासी बहुल गाव. या गावातली 90 टक्के जनता भूमीहीन असल्यामुळं मजुरी करून आपलं गजराण करते. याचाच फायदा घेत ठेकेदारानं 70 ते 80 गरीब जोडप्यांना आपल्या जाळ्यात अडकवलं.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात या सर्व कुटुंबांना कामावर नेलं. दर आठवडी बाजाराला 200 रुपयांची चीरीमिरी देऊन या गरीब कुटुंबांची तात्पुरती भूक या ठेकेदानं भागवली. मात्र तीन वर्षांनंतर या मजुरांचे अडकेलेले लाखो रुपये देण्याची वेळ आली तेव्हा य़ा ठेकेदारानं निर्लज्जपणे हात वर केले. त्यामुळं कुठलाही सहारा नसलेल्या या कुटुंबांवर थेट उपासमारीचीच वेळ आली. यातल्या काही कुटुंबांनी स्वत:ला सावरून घेतलं. मात्र हा धक्का सहन न झाल्यानं दत्ता माघाडे यांनी स्वत:ची जीवनयात्राच संपवली.
सहा जणांच्या माघाडे कुटुंबाचे तब्बल दोन लाख रुपये ठेकेदाराने परस्पर लाटले आहेत. वाताहत झालेल्या संसराची घडी बसवण्यासाठी त्यांची पत्नी आता संघर्ष करत आहे. दत्ता माघाडेंसारखाच या योजनेला बदनाम करणा-या ठेकेदारानं दुसरा बळी घेतला तो टिटवी गावातल्या गजानन डाखोरेंच्या पत्नीचा. डाखोरे आणि त्यांची पत्नीही सिल्लोडध्ये रोजगार हमीच्या कामावर होते. मात्र ठेकेदार पैसे देत नसल्यानं या दोघांमध्ये रोजची भांडणं होऊ लागली.
अखेर रोजाच्या वादाला कंटाळून डाखारे यांच्या पत्नी जांगुनाबाईंनी स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. या दुर्घटनेत जांगुनाबाईंचा चार महिन्यांचा मुलगाही भाजला होता. कुटुंब उध्वस्त झाल्यामुळं गजानन आता एका शेतावर एकांतात आयुष्य कंठत आहेत. अशीच परिस्थीती जवळच्या गोत्रा गावातही आहे. पिळवणूक झालेल्या या आदिवासी गरीब कुटुंबियांनी आवाज उठवण्याचाही प्रयत्न केला. मात्र या भ्रष्ट व्यवस्थेत त्यांचाही आवाज दाबला गेला. ठेकेदारांच्या काळ्या कारनाम्यामुळं ही योजना एवढी बदनाम झाली आहे की उपासमार परव़डली मात्र ही जीवघेणी हमी योजना नको असं म्हणण्याची वेळ या मजुरांवर आलीय.
रोजगार हमी योजनेचा डंका पिटणा-या सरकारकडे या पीडित कुटुंबांच्या प्रश्नावर काय उत्तर आहे? राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचारावर वेगवेगळ्या स्तरातून टीका होऊ लागलीय. भ्रष्ट अधिका-याकडून हा सर्व पैसा वसूल करावा, अशी मागणी कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.