अबब... पुणे विभागीय आयुक्तांकडे कितीही जमीन?

महाराष्ट्रात एखादी व्यक्ती किंवा कुटुंबाची जास्तीत जास्त किती शेतजमीन असू शकते तर, त्याचं उत्तर आहे ५४ एकर. १९६१ चा नागरी जमीन कमाल धारणा कायदा तरी हेच सांगतो. मग, ती व्यक्ती कोणीही असो… राजकारणी, उद्योजक वा सनदी अधिकारी… परंतु पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे मात्र तब्बल ३०० एकर शेत जमीन आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 7, 2014, 08:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
महाराष्ट्रात एखादी व्यक्ती किंवा कुटुंबाची जास्तीत जास्त किती शेतजमीन असू शकते तर, त्याचं उत्तर आहे ५४ एकर. १९६१ चा नागरी जमीन कमाल धारणा कायदा तरी हेच सांगतो. मग, ती व्यक्ती कोणीही असो… राजकारणी, उद्योजक वा सनदी अधिकारी… परंतु पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे मात्र तब्बल ३०० एकर शेत जमीन आहे.
बरं ही जमीन त्यांच्याकडे सरळ मार्गाने आलेली नाही. तर, त्यांनी ती बळकावलीय, असा आरोप शेतक-यांनी केलाय. पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे शेकडो एकर शेत जमीन आहे. त्यांच्यावर नियमबाह्यपणे जमीन बळकावल्याचा शेतक-यांचा आरोप आहे. जमीन कमाल धारणा कायद्याचे देशमुखांकडून उल्लंघन करण्यात आलंय. अवघ्या दहा दिवसांत ३०० एकर शेत जमीन केली एनए करण्यात आलेय, हे विशेष.
पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख. यांना सनदी अधिकारी म्हणायचं की जमीनदार..? देशमुख कुटुंबियांच्या नावे असलेला जमिनीचा हा विशाल पट्टा. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्याजवळच्या जांभे गावात ही जमीन आहे. या जमिनीचा हा सात बारा उतारा पाहायाल्यावर तुमची तोंडात बोटे जातील. सात बारानुसार ही जमीन आहे, ११८ हेक्टर. म्हणजे तब्बल ३०० एकर.
आता या जमिनीवर मालकी हक्क सांगणारी सात बारावरील ही नावं देखमुख कुटुंबीयांची आहेत.
- अनुराधा प्रभाकर देशमुख
- मयुराज प्रभाकर देशमुख
- शशिकांत कृष्णाजी देशमुख… हे प्रभाकर देशमुख यांचे बंधू आहेत.
- अमृतराव दत्ताजीराव निंबाळकर.. हा प्रभाकर देशमुखांचा मेहुणा, त्याशिवाय रमेश कावेडिया आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावं देखील सात बारावर आहेत. मात्र, देशमुख कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतरांची नावं असली तरी, संपूर्ण जमिनीचे खरे मालक देशमुखच आहेत.
एका सनदी अधिका-याची एवढी जमीन पाहून आश्चर्याचा धक्का बसला असेल ना... पण इथले स्थानिक शेतकरी तेच सांगतायत. एवढी शेकडो एकर जमीन प्रभाकर देशमुख यांच्याकडे आली कशी, हा महत्वाचा प्रश्न आहे… या प्रश्नाचं उत्तर तेव्हढंच धक्कादायक आणि गंभीर आहे.
प्रभाकर देशमुखांना लँडलॉर्ड करणारी ही जमीन त्यांना काही वारसा हक्कानं मिळालेली नाही. किंवा कोणी नजराणा (बक्षीस) म्हणूनही दिलेली नाही. तर, त्यांनी ती चक्क विकत घेतलीय. १५ ऑक्टोबर २०१० मध्ये देशमुखांनी तब्बल दोन कोटी रुपये मोजून ही जमीन खरेदी केली. २ कोटींचा आकडा ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल… पण खरा गंभीर प्रकार तर पुढे आहे… या जमिनीचा व्यवहार काही साधा सरळ नाही.
फक्त कागदोपत्रीच गावक-यांचा जमिनीवर हक्क होता असं नाही… तर, जांभे गावचे ग्रामस्थ प्रत्यक्ष ही जमीन कसत देखील होते. तीही वर्षानुवर्षे. नंतर मात्र सात बारावरून अचानक ग्रामस्थांचे नाव कमी झाले. जमिनीचे मालक असल्याचा दावा पाटणकर यांनी केला. तो सरकार दरबारी मान्यही झाला. लगोलग सरकार दफ्तरी तशी नोंद देखील झाली. त्यानंतर लगेचच प्रभाकर देशमुखांनी ही जमीन विकत घेतली. जे वर्षनुवर्षे घडलं नाही. ते सर्व घडलं ते २०१० या एका वर्षात.... आता हा फक्त योगायोग समजायचा का..? स्थानिक शेतक-यांचं म्हणणं आहे.
हा काही फक्त योगायोग नाही. तर जमीन बळकावण्यासाठी प्रभाकर देशमुख यांनी पडद्यामागून केलेला हा सारा उद्योग आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. बरं, जमिनीचे वारस म्हणून जे पाटणकर पुढे आलेत ते खरे की खोटे. अशीही शंका घेतली जातेय. महसूल विभागातील आपल्या वर्षानुवर्षाच्या अनुभवाचा आणि प्रभावाचा वापर करून प्रभाकर देशमुखांनी ही जमीन मिळवली. मात्र त्यामुळं पिढ्यानपिढ्या जमीन कसणारे जांभे गावातले शेतकरी मात्र देशोधडीला लागलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ