फिल्म रिव्ह्यू : अ रेनी डे

मराठी सिनेमांचा, संगिताचा बाज तसा प्रेक्षकांच्या ओळखीचाच... त्यातही जरा वेगळ्या धाटणीचा प्रयोग करून पाहावं म्हटलं तर प्रेक्षक सहजासहजी हा प्रयोग स्वीकारतील का? ही सततची धास्ती... पण, हीच धास्ती थोडी बाजुला करून ‘अ रेनी डे’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांसमोर हजर झालाय... अर्थात, आपलं वेगळेपण जपून.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 9, 2014, 09:39 PM IST


* चित्रपट : अ रेनी डे
* दिग्दर्शक : राजेंद्र तालक
* साऊंड डिझायनिंग : रसुल पोकुट्टी
* संगीतकार – गायक : मिलिंद इंगळे
* कलाकार : मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, नेहा पेंडसे, अजिंक्य देव, संजय मोने, किरण करमरकर, हर्ष छाया, सुलभा आर्या, मनोज जोशी

www.24taas.com
शुभांगी पालवे, झी मीडिया

मराठी सिनेमांचा, संगिताचा बाज तसा प्रेक्षकांच्या ओळखीचाच... त्यातही जरा वेगळ्या धाटणीचा प्रयोग करून पाहावं म्हटलं तर प्रेक्षक सहजासहजी हा प्रयोग स्वीकारतील का? ही सततची धास्ती... पण, हीच धास्ती थोडी बाजुला करून ‘अ रेनी डे’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांसमोर हजर झालाय... अर्थात, आपलं वेगळेपण जपून.

काय आहे सिनेमाचं कथानक…
‘कॉर्पोरेट वर्ल्ड’ नावाचा अजस्र अजगर आणि या अजगरासाठी 'प्रॉफिट' नावाचं खाद्य मिळवायचंय काम मॅनेजमेंटचं... ‘बाय हुक ऑर बाय क्रूक’... आपण करतोय त्यात काहीही चूक नाही, हीच तर आजकालची रीत आहे, यावर ठाम विश्वास असणाऱ्या मंडळींची मनात यत्किंचितही किंतू न बाळगता आपल्या ध्येयाकडे वाटचाल... आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्यासाठी सदैव तयार... या मनोवृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा अनिकेत (सुबोध भावे).
पण, अगदी अनिकेतच्या विरुद्ध आणि स्वतंत्र विचार करणारी मुग्धा... मुलीनं कितीही मोठं भोकाड पसरलं तरी चालेल पण कुणाची वस्तू चोरून-हिसकावून घेऊ न देणाऱ्या आईच्या संस्कारात वाढलेली... खूप प्रेम करतेय ती अनिकेतवर... तिच्या नवऱ्यावर... सर्व सुखं त्यानं तिच्या पायाशी घातलेत... या सुखांचा उपभोग घ्यायला एक नवा जीव अंकुरलाय तिच्या उदरात... त्याचा एक वेगळाच आनंद...
अचानक अनिकेतनं आपल्या बायकोपासून – मुग्धापासून लपवून ठेवलेल्या अनेक गोष्टी गूढरित्या एक-एक करून तिच्यावर धाड-धाड आदळतात... आणि ती मूळापासून हादरून जाते... आणि एका रहस्यमयी वळणानं सिनेमा पुढे सरकत जातो...

अभिनयाला दाद द्यायलाच हवी...
कलाकारांची योग्य निवड, उत्तम संवाद, उत्तम संवादफेक, पार्श्वसंगीत यांच्या जोडीला सुबोध आणि मृणालची भावस्पर्शी अभिनय... केवळ नजरेतून किती गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात, याचा अनुभव या दोघांच्या अभिनयातून दिसतो.

चित्रपटाचं संगीत
चित्रपटात केवळ दोन गाणी असल्यानं उगाचच चित्रपटाची लांबी वाढत नाही. त्यातही आरती अंकलीकर-टीकेकर यांच्या आवाजातली ‘गोष्ट माझी अन् तुझी… शेवटा नेऊ कशी? मी तुझ्या नात्यातली... भैरवी गाऊ कशी?’ ही भैरवी म्हणजे दुधावरची साय... त्यांच्या आवाजातलं ‘अरण्यरुदन’ही ऐकायला एक वेगळीच गंमत आहे.

चित्रपटाच्या जमेच्या बाजू
चित्रपटाच्या दिग्दर्शनाला पैकीच्या पैकी मार्क... चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं पार्श्वसंगीत... बाराही महिने पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलंय. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात बॅकग्राऊंड म्युझिकला ऐकू येणारा निसर्गनिर्मित आवाजच चित्रपटाच्या कथेला योग्य असं वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरतो. महत्त्वाचं म्हणजे, ऑस्कर विजेते रसुल पोकुट्टी यांनी या चित्रपटासाठी साऊंड डिझायनिंग केलीय.
चित्रपटाच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत अंधार आणि प्रकाशच्या खेळावर आपला रंग बदलणाऱ्या वातावरणानं प्रेक्षकांनाही कथेसोबत वाटचाल करण्याचा अनुभव येतो. संजय जाधव यांनी हा अंधार-प्रकाशाचा खेळ हाताळलाय. चित्रपटात अनावश्यक असलेल्या गोष्टींना आवर घातल्यानं चित्रपट रहस्यमयी पद्धतीनं पण, सुटसुटीतपणे प्रेक्षकांच्या मनावर ठासतो.
थोडक्यात काय तर...
हलक्या-फुलक्या आणि विनोदी चित्रपटांच्या पुढे जाऊन एखाद्या गंभीर विषयावरची उत्तम मांडणी पाहायची असेल, तर हा सिनेमा नक्कीच टाळू नये...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.