फिल्म रिव्ह्यू : ‘फँड्री’च्या नावानं चांगभलं!, film review : fandry

फिल्म रिव्ह्यू : ‘फँड्री’च्या नावानं चांगभलं!

<B> <font color=red>फिल्म रिव्ह्यू :  </font></b> ‘फँड्री’च्या नावानं चांगभलं!


* चित्रपट : फॅन्ड्री
* दिग्दर्शक : नागराज मंजुळे
* कलाकार : सोमनाथ अवघडे (जब्या), सुरज पवार (जब्याचा मित्र) किशोर कदम (वडील), छाया कदम (आई), राजेश्वरी खरात, नागराज मंजुळे
* थीम साँग : अजय-अतुल
* वेळ : 139 मिनिटwww.24taas.com,
शुभांगी पालवे, मुंबई

‘चिमणी बाम्हनीन असती, तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाहीत तिला... टोच्या मारून मारून जीव घेत्यात तिचा...’ पक्षांमध्येही असतो हा इतका टोकाचा भेदभाव? पण, माणसांमध्ये मात्र हा भेदभाव स्पष्टपणे दिसून येतो. जात, रंग, लिंग, भाषा, देश अशा कित्येक पातळ्यांवर... आणि प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे...

कथानक आणि समाजमन
समाजाची हीच दाबून ठेवलेली, कुजलेली घडी उघडून आपलं प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतोय जब्या... जांबुवंत... ‘ती’च्यावर जीवापाड प्रेम आहे जब्याचं... तिच्यासाठी काहीही करायला तो तयार आहे. कदाचित त्याची शाळेची वारीही फक्त आणि फक्त तिच्यासाठीच सुरू आहे. त्याला समोर तीच दिसतेय... आणखी कुणीही नाही... आणखी काहीही नाही... तिच्यातलं आणि त्याच्यातलं सामाजिक अंतर समजण्याचं त्याचं वयही नाही आणि इच्छाही... पण, हे अंतर त्याच्या जेव्हा ध्यानात येतं, तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते... आणि विशेष म्हणजे हे सगळं समजण्यासाठी त्याला शब्दांची गरजच लागत नाही.


जब्याचं आयुष्य : सत्य आणि स्वप्न
एका दलित कुटुंबातला... जब्या... जांबुवंत... अवघ्या १४-१५ वर्षांचा मुलगा... शाळेत जातोय... पण, त्याच्या वहिच्या पानांवर अभ्यास नाही तर शालूसाठी लिहिली प्रेमपत्रं आहेत... तिला कधीही देण्याची हिंमत झाली नाही म्हणून वहितच राहिलेली... ही वही त्याच्या घरच्यांच्या कुणाच्याही हातात पडली तरी त्याला भीती नाही. कारण, त्याच्या कुटुंबातलं दुसऱ्या कुणी अद्याप शाळेत पाऊलही टाकलं नाही.

तसं आईला मात्र आपल्या जब्याला शाळेत अभ्यास करताना दुरुनच चोरून-लपून पाहावसं वाटतं पण, तिची शाळेत जाण्याची हिंमत होत नाही... आणि हिंमत करून जरी ती शाळेत गेली तरी आपल्या वर्गातील मुलं चिडवतील या भीतीनं जब्याला ती शाळेत आलेली आवडत नाही. त्यामुळे तो तिला शाळेत न येण्याविषयी बजावून सांगतो.

जब्याच्या बापाला मात्र आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता आहे... विशेतष: मुलींची, त्यांच्या लग्नाची आणि यासाठी द्यावा लागणाऱ्या हुंड्याची... जब्या मुलगा आहे म्हणून किमान तो शाळेत तरी जातोय... जब्याच्या मोठ्या बहिणीला आपल्या तान्हुल्यासह बापाच्या घरी यावं लागलंय. तिच्याप्रमाणे आपल्या छोट्या मुलीच्या आयुष्याचंही वाट्टोळं होऊ नये, अशी बापाला काळजी लागलीय.

आणि या सगळ्या वातावरणात वाढणारा `जब्या`... एकाच वेळी सत्य आणि स्वप्नातल्या आयुष्यात जगणारा - बुडणारा... आणि आपल्या शाळेत शिकणाऱ्या `शालू`वर अगदी मनापासून प्रेम करणारा...

मग काय... शिक्षण पूर्ण करणार का जब्या? शालूसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार? की समाजाच्या जोखडांमध्ये गुरफटून रक्तबंबाळ होणार?

<B> <font color=red>फिल्म रिव्ह्यू :  </font></b> ‘फँड्री’च्या नावानं चांगभलं!

चित्रपटाची बोलकी भाषा
चित्रपट पाहताना भाषेची, शब्दांची फारशी गरजच भासत नाही... त्यामुळे मराठी भाषा न समजणाऱ्या प्रेक्षकांनाही भाषेची अडचण नक्कीच जाणवणार नाही.

चित्रपटाचं दिग्दर्शन कमालीचं झालंय. प्रत्येक सीनमध्ये शब्दांहून अधिक काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणारं... चित्रपटातील संवादही मोक्याचेच...

पिऱ्याच्या घरात सहज वावरणारा जब्या जेव्हा वर्गातल्या कुलकर्ण्याच्या घरी जातो तेव्हाच्या त्याच्या हालचाली... जत्रेत इतर सर्व नाचत असताना दिव्याखालच्या अंधारात उभा असणारा जब्या... शाळेसमोर सर्वांदेखत बापाचा मार खाणारा जब्या... किंवा फुले, आंबेडकर, शाहू महाराज, गाडगे बाबा यांच्या फोटोसमोरून काठिला डुक्कर बांधून घेऊन जाणारा जब्या आणि त्याची बहिण... अशा खूप काही गोष्टी खूप काही सांगून जातात...

कलाकारांचा अभिनय
विशेष म्हणजे चित्रपटाच्या नायकाची `जब्या`ची भूमिका अप्रतिमरित्या साकारणारा सोमनाथ अवघडे याचा हा पहिलाच चित्रपट आहे. सोमनाथ खऱ्या आयुष्यातही आपल्या वडिलांसोबत हलगी वाजवण्याचं काम करतो... अपघातानं म्हणा पण त्यानं या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावलीय. या सिनेमानं सोमनाथच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी दिलीय.

जोगवा, नटरंग फेम किशोर कदम ऊर्फ सौमित्र यानं या चित्रपटात जब्याच्या वडिलांची... समाजाच्या अपमानाखाली एका पिचलेल्या पण आपल्या मुलांच्या भवितव्याला समोर ठेऊन गुमान सगळं काही सहन करणाऱ्या पित्याची... भूमिका उत्तम वठवलीय तर जब्याच्या आईच्या भूमिकेत दिसतेय छाया कदम... या दोघांच्याही अभिनयाला दाद द्यावी तितकी कमीच...

प्रदर्शनाआधीच ‘फॅन्ड्री’वर पुरस्कारांचा वर्षाव
ऑक्टोबर 2013 मध्ये हा सिनेमा पहिल्यांदा ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. प्रदर्शनाआधीच ‘फॅन्ड्री’नं विविध फिल्म फेस्टीव्हल आणि चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

पुण्यात झालेल्या ‘पिफ’ म्हणजेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘फॅन्ड्री’वर पुरस्कारांचा वर्षाव झाला होता. यावेळी ‘सर्वोत्कृष्ट सिनेमा’ तसंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नागराज मंजुळे, सर्वोत्कृष्ट अभिनेता सोमनाथ आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी विक्रम अमलारी आणि प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीची फिल्म असे पाच पुरस्कार मिळवत ‘फॅन्ड्री’ने बाजी मारली होती.

तसंच राज्य सरकारतर्फे दिला जाणाऱ्या ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’वरही ‘फॅन्ड्री’नंच आपली मोहोर उमटवलीय. `ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट च्या ५७ व्या लंडन फिल्म फेस्टिवलमध्येही ‘फॅंड्री’चाच बोलबाला राहिला.

बंगुळरू आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट इंडियन फिल्म ऑफ द इअर 2013’ – द एफआयपीआरइएससीआय इंडिया – फिल्म क्रिटिक’ पुरस्कारही फॅन्ड्रीनंच पटकावलाय.व्हिडिओ पाहा – सोमनाथ आणि फँन्ड्रीची कथा... त्याच्याच शब्दांत...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 14, 2014, 16:13


comments powered by Disqus