गजाआडून माजी मंत्र्यांची राजकीय खलबतं

Last Updated: Wednesday, March 12, 2014 - 20:17

www.24taas.com, प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्तांची लगबग वाढली आणि राजकीय खलबतं सुरु झाली तर त्यात विशेष काही नाही.
पण आता जेल आणि न्यायालयांच्या परिसरातही राजकीय खलबतं होताहेत.
कारण राज्याचे काही माजी मंत्री गजाआड आहेत, पण तिथूनही ते राजकीय सुत्र हलवताहेत. त्यामुळं राजकीय कार्यकर्त्यांच्या जेल आणि न्यायालय परिसरात फे-या वाढल्यात.
मनिष जैन हे रावेर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, तर हे आहेत डॉ. सतीश पाटील. जळगाव मतदारसंघातले उमेदवार. हे दोघेही धुळे न्यायालयात आले होते.
सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर या गडाआड असलेल्या आपल्या नेत्यांचा आशिर्वाद घेण्यासाठीच हे दोघे थेट न्यायालयात पोहोचले.
विशेष म्हणजे न्यायदेवतेच्या साक्षीने आणि आचारसंहिता असतानाही हे राजकीय उद्योग थेट न्यायालयात बिनबोभाट सुरू आहेत.
 
राजकीय कार्यकर्त्यांची कारागृहाच्या आवारात नेहमीचीच वर्दळ आहे. जळगाव पासिंगची इथे वाहनं उभी असतात.
एवढंच नाही तर खास पोलीस दलातले काही कर्मचारीही भेटीला आलेल्या नेत्यांना कारगृहात नेत्यांशी भेट घालून देण्यासाठी सज्ज असतात.
दररोज चार ते पाच कार्यकर्ते तुरूंगाबाहेर उपस्थित असतात. अगदी महत्त्वाच्या टीप्स घ्यायच्या असतील तर हे कार्यकर्चे थेट सुनावणीच्या दिवशी न्यायालयात पोहोचतात.
कुठल्याही कैद्याला महिन्यातून नातेवाईकांना भेटण्याची फक्त दोनदा परवानगी असते. इथे मात्र अनेकवेळा हे नियम धाब्यावर बसवले जातात.
या कारागृहात या नेत्यांना शाही वागणूक मिळत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय.
 
एकूणच सध्या राजकीय रंग उधळले जात असतानाच हे दोन महत्त्वाचे नेते थेट कारागृहातून बाहेरच्य़ा गोष्टी मॅनेज करत आहेत हे स्पष्ट आहे.
हे सर्व पाहिल्यावर कायदा खरोखरच सर्वाना समान आहे का असा प्रश्न पडतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 12, 2014 - 20:17
comments powered by Disqus