गो गोवा गॉन : कॉमेडीसह `झोम्बीज`चा नवा प्रयोग!

झोम्बीजला कॉमेडीचा तडका बसलेल्या ‘गो गोवा गॉन’ या सिनेमाची कॉन्सेप्ट १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय सिनेमासाठी मात्र नवीनच आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 10, 2013, 07:34 PM IST

सिनेमा - गो गोवा गॉन
दिग्दर्शक - राज आणि डीके
कलाकार - सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दार, आनंद तिवारी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झोम्बीजला कॉमेडीचा तडका बसलेल्या ‘गो गोवा गॉन’ या सिनेमाची कॉन्सेप्ट १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय सिनेमासाठी मात्र नवीनच आहे. बॉलिवूडमध्ये भूत, प्रेत, आत्मा आणि असामान्य घटनांवर आधारित तर दिसतात परंतू, सुपरनॅचरल आणि हॉरर जोनर आता पुन्हा एकदा या सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर परतणार आहे.
तरुण दिग्दर्शकांच्या जोडी राज आणि डीके एका नव्या पद्धतीचा झोम्बी घेऊन आलेत. याचनिमित्तानं प्रेक्षकांनाही झोम्बी ही नक्की काय भानगड असते हे कळू शकेल. परदेशांत या झोम्बी फिल्म्सची चलती आहे. एक सामान्य माणूस ड्रग्जच्या अति सेवनामुळे झोम्बीमध्ये बदलतो आणि या झोम्बी इतर व्यक्तींच्या संपर्कात आली तर त्या व्यक्तीही झोम्बी बनतात, ही गो गोवा गॉनची मूळ थीम...
हार्दिक (कुणाल खेमू) आणि लव (वीर दार) आपल्या नव्या मित्रासोबत (आनंद तिवारी) बरोबर गोवा ट्रीपला निघतात. आजच्या काही युवकांप्रमाणे नशा करण्याची सवय यांनाही आहे. आयुष्यात एक्साइटमेंट निर्माण करण्यासाठी ते कोणत्याही हद्द ओलांडण्यासाठीही तयार आहेत. त्यातच लवची ओळख लूना (पूजा गुप्ता) हिच्याबरोबर होते. लूना त्याला घेऊन एका दूरवरच्या बेटावर रेव्ह पार्टीसाठी घेऊन जाते. एका नव्या अंमली पदार्थाच्या लॉन्चिंगसाठी रशियन माफिया बोरिस (सैफ अली खान) यानं ही पार्टी आयोजित केलीय. या ठिकाणी हे सर्व जण अंमली पदार्थाचं सेवन करतात आणि जेव्हा ते शुद्धीत येतात तेव्हा ते झोम्बीच्या कचाट्यात सापडलेले असतात.
राज-डीके या दोघांनी ही कथा रोमांचक आणि विश्वसनीय बनवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलाय. पहिल्यांदा पाहिलं तर हा सिनेमा थोडा विचित्र वाटतो पण, हा सिनेमा युवकांची मानसिकता लक्षात घेऊन बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय. कॉमेडीचा तडकाही सिनेमाला दिला गेलाय. आयुष्यातून भटकलेल्या झालेल्या शहरी युवकांचं चित्रण या सिनेमात करण्यात आलंय.
सैफ अली खाननं आपली भूमिका पूर्ण जोशात निभावलीय. कुणाल खेमू आणि वीर दास यांची जोडी चांगलीच जमलीय. अभिनेत्रींना या सिनेमात काही खास जागा देण्यात आलेली नाही. कॉमेडी असली तरी हा सिनेमा अॅडव्हेन्चरनं पूरपूर भरलाय. स्क्रीन प्लेमध्ये कॉमेडीला चांगल्या पद्धतीनं वापरलं गेलंय. सिनेमातील हसणं-खेळणं वातावरण थोडं हलकं फुलकं करतं. त्यामुळे सिनेमात रक्तपात दिसला तरी प्रेक्षकांचं हसू मात्र कायम राहतं. या सिनेमातील गाणी चांगलीच जमलीत. थीमनुसार असल्यामुळे ती पाहायलाही चांगली वाटतात. डॉगलॉग लिहिण्याची पद्धत चांगलीच आहे तरुण प्रेक्षकांना ध्यानात ठेऊनच ती लिहिली गेलीत.

सैफनं आपल्या भूमिकेत चांगलाच बॅलन्स जमवून आणलाय. कुणाल खेमू, वीर दास आणि आनंद तिवारी यांचाही अभिनय पाहण्यासारखा आहे. आनंद तिवारीसाठी हा सिनेमा त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट असू शकतो. जास्त महत्त्व नसलं तरी पूजा गुप्ताही चांगलाच अभिनय केलाय. एका नव्या प्रयोगासह प्रेक्षकांसमोर आलेला ‘गो गोवा गॉन’ प्रेक्षकांना चांगलंच एन्टरटेन करतो.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.