जाणून घ्या... शिवसेनेतल्या ‘बंडखोरां’चा इतिहास!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानित होऊन व्यासपीठावरून घरी जावं लागलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 15, 2013, 06:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अपमानित होऊन व्यासपीठावरून घरी जावं लागलं. यानिमित्ताने शिवसेनेतील वाद, बड्या नेत्यांनी पक्षाला केलेला जय महाराष्ट्र आणि राज ठाकरेंसह अनेकांनी वेगळ्या राजकीय पक्षात मांडलेला संसार, यावर दृष्टीक्षेप टाकणारा हा खास रिपोर्ट...

1995 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर ज्या शिवाजी पार्कवर मनोहर जोशींचा मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक झाला, त्याच शिवाजी पार्कवर परवाच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन जोशीसरांना घरी परतावं लागलं. शिवसेनेच्या इतिहासात हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीही अनेकांना शिवसैनिकांच्या रोषाचे धनी व्हावं लागलंय. ठाकरे कुटुंबीयांशी मतभेद झाल्यानं अनेकांना शिवसेनेला जय महाराष्ट्र करावा लागलाय.

30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसलेले अॅडव्होकेट बळवंत मंत्री यांना 1967 साली शिवसेना सोडावी लागली. पक्षात लोकशाही हवी, या मुद्यावरून वाद झाला. त्यातून त्यांना मारहाणही झाली. भारतीय कामगार सेनेचे सचिव असलेले कामगार नेते अरूण मेहता यांनीही अंतर्गत बंडखोरीमुळे शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये सामील झाले. 1974 सालच्या लोकसभा पोटनिवडणुकीत बॅरिस्टर रामराव आदिक यांना पाठिंबा देण्याच्या मुद्यावरून वाद झाल्यानंतर बंडू शिंगरे यांनी शिवसेनेला रामराम केला. 1975 मध्ये त्यांनी प्रति शिवसेनाही स्थापन केली. 1977 च्या महापौरपदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार मुरली देवरा यांना पाठिंबा जाहीर केला. ही बाब खुपल्याने शिवसेनेचे पहिले महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते यांनी शिवसेना सोडली. बाळासाहेबांचे आणखी एक विश्वासू सहकारी दत्ता प्रधान यांनीही 1977 मध्येच त्यांची साथ सोडली. शिवसेनेत घराणेशाही फोफावत असल्याचा आरोप करत माधव देशपांडेही शिवसेनेतून बाहेर पडले.
शिवसेनेला सर्वात मोठा झटका दिला तो 1991 साली छगन भुजबळ यांनी... मनोहर जोशी यांना विरोधी पक्ष नेते केल्याच्या रागापोटी भुजबळांनी तब्बल 17 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत पहिली मोठी फूट पाडली. शिवसेना मंडल आयोगाच्या शिफारशींना विरोध करत असल्याचं कारण देत त्यांनी पक्ष सोडला आणि शरद पवारांच्या पाठिंब्याने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.
2005 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही सात आमदारांसह शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या वादामुळे राणेंसारख्या कडवट शिवसैनिकाला पक्षाचा त्याग करावा लागला. दरम्यानच्या काळात डॉ. रमेश प्रभू, सतीश प्रधान, गणेश नाईक, संजय निरूपम, बाळासाहेब विखे पाटील, सुरेशदादा जैन, गुलाबराव गावंडे, सुरेश नवले, सुबोध मोहिते, तुकाराम रेंगे पाटील, विलास गुंडेवार अशा अनेकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यापैकी जैन, गावंडे पुन्हा शिवसेनेत दाखल झालेत.

मात्र अलिकडच्या काळात शिवसेनेला कुणी मोठा दणका दिला असेल तर तो ठाकरेंच्या रक्तानेच... 2006 मध्ये राज ठाकरे यांनीही शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकला. ठाकरे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने शिवसेना सोडल्याचा हा पहिलाच प्रसंग होता. उद्धव ठाकरेंशी झालेल्या मतभेदानंतर राज ठाकरेंनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ची वेगळी चूल मांडली.

आता मनोहर जोशींवरही शिवसेना सोडण्याची पाळी आलीय, असं बोललं जातंय. जोशींसारखे लोक राजकारणात सन्मानानं निवृत्त का होत नाहीत? असा प्रश्नही आता विचारला जातोय. शिवसेनेसाठी असे आघात नवे नाहीत. असे अनेक धक्के शिवसेनेने पचवलेत. पण त्यामुळं शिवसेनेची मुळं कमकुवत झालीयत, एवढं मात्र नक्की...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.