`लोकमान्य` लोकांपर्यंत पोहचणार?

मुंबईत लोकमान्य टिळकांचं समाधीस्थळ कुठंय? असा प्रश्न विचारला तर किती मुंबईकरांना त्याचं अचूक उत्तर देता येईल...

शुभांगी पालवे | Updated: Aug 1, 2013, 11:48 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज लोकमान्य टिळक म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी... मुंबईत लोकमान्य टिळकांचं समाधीस्थळ कुठंय? असा प्रश्न विचारला तर किती मुंबईकरांना त्याचं अचूक उत्तर देता येईल सांगता येत नाही. महात्मा गांधींचं समाधीस्थळ म्हटलं की, जसा दिल्लीतला राजघाट आठवतो तसं टिळकांच्या बाबतीत होत नाही. त्यामुळंच गिरगाव चौपाटी येथील त्यांच्या समाधीस्थळाच्या परिसराचं `स्वराज्यभूमी` असं नामकरण व्हावं, अशी मागणी पुढे येतेय.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ असं ब्रिटिशांना ठणकावून सांगणारे आणि स्वातंत्र्य क्रांतीची मशाल पेटवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं १९३३ साली उभारलेलं गिरगाव चौपाटीवर समाधीस्थळ उभारण्यात आलं. पण, एकेकाळी देशभक्तांसाठी प्रेरणास्थान असणाऱ्या या समाधीस्थळाचा आज अनेकांना विसर पडलाय. अनेकांना माहितही नसेल की लोकमान्यांचं समाधीस्थळ इथं आहे. त्यामुळेच या समाधीस्थळाचं ‘स्वराज्यभूमी’ असं नामकरण करून लोकमान्य टिळकांचं यथोचित स्मारक उभारलं जावं म्हणून गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. पण शासकीय पातळीवरून त्याकडं साफ दुर्लक्ष होतंय.

एकीकडं ही परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या राजशिष्टाचारात देखील लोकमान्यांना यथोचित स्थान नाही अशी खंत टिळकप्रेमींनी व्यक्त केलीय. देशाच्या महापुरुषांच्या समाधीस्थळांना योग्य तो दर्जा देण्यात आलाय. पण भारतीय असंतोषाचे जनक ठरलेल्या लोकमान्य टिळकांचं समाधीस्थळ त्याबाबतीत उपेक्षितच राहिलं.
नाव बदललं किंवा नाही कमीत कमी तरी या स्मृतीस्थळाला यथोचित दर्जा देऊन लोकमान्यांच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढ्यांसमोर जिवंत ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल का? हाच खरा प्रश्न आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.