वर्षभरापूर्वी मंत्रालयाला आग, शासनालाही अजूनही नाही जाग!

मंत्रालयाला लागलेल्या आगीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मात्र एक वर्षानंतरही मंत्रालयाचा कारभार अजूनही विस्कळीतच आहे. मंत्रालयातील घडी पूर्णपणे बसवण्यात एका वर्षानंतरही शासनाला यश आलेलं नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 21, 2013, 08:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मंत्रालयाला लागलेल्या आगीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मात्र एक वर्षानंतरही मंत्रालयाचा कारभार अजूनही विस्कळीतच आहे. मंत्रालयातील घडी पूर्णपणे बसवण्यात एका वर्षानंतरही शासनाला यश आलेलं नाही. मंत्रालयाच्या नुतनीकरणाचं काम जोरात सुरू असलं तरी ते पूर्ण व्हायला अजून बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे मंत्रालयाबाहेर गेलेले विभाग पुन्हा इथे यायला वेळ लागणार असून तोपर्यंत मंत्रालयातील कारभार पूर्णपणे सुरळीत होणार नाही.
२१ जून... वर्षातला सर्वात मोठा दिवस... राज्य सरकारसाठी काळा दिवस

२१ जून २०१२ ला दुपारी मंत्रालयाला आग लागली आणि हा..हा म्हणता मंत्रालयाचे चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात हतबलपणे या आगीकडे पाहण्यापलीकडे काहीच नव्हते. कारण आगीशी लढा देणारी कोणतीच यंत्रणा मंत्रालयात नव्हती. अग्निशमन दलाच्या गाड्या आतपर्यंत पोहचण्यासाठी जागा नव्हती..त्यातच मंत्रालयातील दालनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेलेले प्लायवूड, मंत्रालयातील कागदाच्या फाईल्सचे गठ्ठे यामुळे आग झपाट्याने पसरली...आणि ती आटोक्यात आणण्यात सकाळ उजाडली...या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. या आगीनंतर राज्य सरकारने मंत्रालयाचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. जळालेल्या मजल्यांबरोबरच इतर मजल्यांचंही नूतनीकरण केलं जाणार आहे. सध्या मंत्रालयातील जळलेल्या ४ ते ७ मजल्यांच्या मेकओव्हरचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय..कामामुळे होणारा आवाज, धूळ यामुळे मंत्रालयातील कर्मचारी त्रस्त आहेत. मंत्रालयातील वरील चार मजल्यांच्या मेकओव्हरचे काम पूर्ण व्हायला अजून २ ते ३ महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खालील तीन मजल्यांच्या मेकओव्हरचे काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रालयाची घडी पूर्वीसारखी बसायला अजून अंदाजे वर्षभराचा कालावधी जाईल अशी शक्यता आहे.
आगीनंतर मंत्रालयातील अनेक विभाग मंत्रालयाबाहेर हलवण्यात आले. काही विभाग वर्ल्ड ट्रेड सेंटर, काही विभाग सेंट जॉर्ज रुग्णालय तर काही विभाग जीटी रुग्णालयात हलवण्यात आले. यामुळे सर्वसामान्यांची मात्र नाहक धावपळ होतेय...तसंच कर्मचाऱ्यांनाही या इतर विभागात काम असेल तर त्या-त्या ठिकाणी धावपळ करावी लागतेय. त्यामुळे मंत्रालयातील कामात अद्यापही विस्कळीतपणा आहे. मंत्रालयाचा मेकओव्हर करताना सुरक्षिततेबाबत अत्यंत काळजी घेण्यात आली आहे.

- मेकओव्हरच्या कामात फायरफ्रूफ सामानाचा वापर
- प्रत्येक मजल्यावर वेटरायझर्स आणि स्मोक डिटेक्टरसह स्प्रींकलर्स बसवणार
- मुख्य इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर कोर्टयार्डमध्ये तीन मीटर रुंदीचे अतिरिक्त कॉरिडोर
- मध्यवर्ती वातानुकूलीत यंत्रणा
- मधल्या पोर्चमध्ये सरकते जीने
- मेकओव्हर करताना १ लाख चौ. फूटाचे अतिरिक्त बांधकाम
- मंत्री, सचिव दालने आणि विभागांच्या कार्यालयांची रचना सुटसुटीत
- सातव्या मजल्यावर मंत्रिमंडळ सभागृह आणि मिटिंग हॉल
- सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांचं दालन
- मुख्य इमारतीत प्रत्येक मजल्यावर तीन कॅबिनेट मंत्र्यांची दालने, प्रत्येक दालन १८०० चौ. फुटांचे
- प्रत्येक मजल्यावर पाच सचिवांची दालने, प्रत्येक दालन ६०० चौ. फुटांचे
- इमारतीच्या उत्तर आणि दक्षिण भागात मंत्रालयातील अधिकाऱ्यांसाठी दालने
- प्रत्येक विभागाचे अधिकारी अभ्यागत कक्षात नागरिकांच्या तक्रारी ऐकणार
- तक्रारींसाठी खास कम्प्युटराइज्ड यंत्रणा, कामाची सद्यस्थितीही कळणार
- राज्यमंत्र्यांची दालने विस्तारित इमारतीत
- बसमेंटमध्ये ५४२ मोटारींसाठी पार्किंगची व्यवस्था
- मंत्रालयातील उद्यानाखाली ९ लाख घन मीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या
- युनिटी कंन्स्ट्रक्शनकडून मेकओव्हरचे काम
- १३८ कोटींचा खर्च, खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता
अशा प्रकारे आगीनंतर सुरक्षिततेबाबत जाग आलेल्या राज्य सरकारने मंत्रालयाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हाती घेतले आहे. मात्र हे काम पूर्ण होईपर्यंत मंत्रालयाच्या कारभाराची घडी विस्कळीतच असणार आहे आणि त्याचा त्रास मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या जनतेबरोबरच, इथल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनाही सोसावा लागणार आहे.

*