एका मच्छरने थांबवलं मुंबईतील मृत्यूचं तांडव

एका मच्छरने वाचले अनेक मुंबईकरांचा जीव. दहशतवादी यासिन भटकळच्या चौकशीतून माहिती उघड झालेय. दहशतवाद्याला मलेरिया झाल्याने काही अंशी रक्तपात टळला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 8, 2014, 11:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एका मच्छरने वाचले अनेक मुंबईकरांचा जीव. दहशतवादी यासिन भटकळच्या चौकशीतून माहिती उघड झालेय. दहशतवाद्याला मलेरिया झाल्याने काही अंशी रक्तपात टळला.
एका मच्छरने अक्षरशः मुंबईत मृत्यूचं तांडव थांबवलं. १३ जुलै २०११ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेवेळी दहशतवाद्याला एक मच्छर चावला आणि अनेकांचे संसार उद्धवस्त होण्यापासून वाचले... हा मच्छर दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरत तर मुंबईकरांसाठी वरदान.
मुंबईकारांसाठी मच्छर जीवघेणा ठरला तसा तो दहशतवाद्यांचाही कर्दनकाळ बनला... या मच्छरमुळे अनेकांचे प्राण वाचले... हा खुलासा केला आहे महाराष्ट्र एसटीएसने... दहशतवादी यासिन भटकळच्या चौकशीनंतर ही माहिती उजेडात आली आहे. १९९३ प्रमाणे मुंबई बॉम्बस्फोटांच्या मालिकेनं हादरवण्याचा इंडियन मुजाहिद्दीनचा कट होता. पण त्याच दरम्यान बॉम्ब प्लांट करणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला मलेरिया झाला.
तो दहशतवादी म्हणजे पाकिस्तानी नागरिक वकास शेख... शेखकडेच १३ जुलै २०११ ला मुंबईत बॉम्ब प्लांट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. १३ जुलैला मुंबईत दादर, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊसमध्ये सलग तीन बॉम्बस्फोट झाले. पण या पेक्षाही मोठा घातपात घडवण्याचा कट होता, अशी माहिती यासिन भटकळच्या चौकशीतून समोर आलीय.

दादरचं सिद्धिविनायक मंदिर, दादर टीटी मार्केट, एसटी बस स्टँड, आणि स्वामी नारायण मंदिराशिवाय अंधेरी पश्चिमेला असलेलं मॅकडोनाल्ड्स, जुहू बीच, कोलाबा मार्केट आणि नळ बाजाराचीही रेकी करण्यात आली होती. एवढंच नव्हे तर मुंबई पोलिस आयुक्तांचं कार्यालय आणि महाराष्ट्र एटीएसचं आफिसही दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं. पण १३ जुलै २०११ आला ज्या वकास शेखवर अनेक ठिकाणी बॉम्ब प्लांट करण्याची जबाबदारी दिली होती तोच ऐनवेळी मच्छरचा शिकार बनला.
मलेरियामुळे तो पुरता बेजार झाला. त्याला अखेर रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे दहशतवाद्यांकडे वेळ फार कमी होती. त्यांनी प्लॅन बी नुसार ४ ठिकाणी बॉम्ब पेरले. त्यापैकी तीन फुटले मात्र एक बॉम्ब तांत्रिक चुकीमुळे फुटलाच नाही. या तीन बॉम्बस्फोटांमध्ये २१ जण ठार १३३ जण जखमी झाले.
जर वकास शेखवर ऐनवेळी मच्छरने हल्ला केला नसता तर मुंबईत १३ जुलै २०११ ला रक्तपात घडला असता... मच्छरने त्यावेळी मुंबईकरांचे प्राण वाचवले असले तरी यासिन भटकळचा मित्र दहशतवादी वकास शेख मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>