ना`पाक` इरादा...

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, January 15, 2013 - 22:23

www.24taas.com, नवी दिल्ली
पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाही. दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या करुन पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला खरा रंग दाखवलाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारताचे लष्करप्रमुख तसेच पंतप्रधानांनी पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावलं आहे.
८ जानेवारी २०१३... दोन भारतीय सैनिकांची निघृण हत्या... भारतीय हद्दीत घुसखोरी करुन दोन सैनिकांचा शिरच्छेद केला गेला आणि पुन्हा एकदा पाकचा ना’पाक’ इरादा स्पष्ट झाला. पाकिस्ताननं गेल्या १४ दिवसात तब्बल नऊ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.
शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या सैनिकांनी मंगळवारी सकाळी साडे आकरा वाजता नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि दोन भारतीय सैनिकांचं शिरकाण केलं शहीद लान्सनायक हेमराज यांचं शिर कापून नेण्याचा माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य पाकिस्तानी सैनिकांनी केलंय. या अमानवीय घटनेमुळे देशभर असंतोषाची लाट पसरलीय. लष्करप्रमुख विक्रमसिंह यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावलंय. सेनाप्रमुखांनी जशास तसं उत्तर देणार असल्याचं लष्करप्रमुखांनी सांगितल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या ‘चकन दा बाग’मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या ब्रिगेडिअर स्तरावरच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. जवळपास पंधरा मिनिटं झालेल्या या बैठकीत पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा मुद्दा भारतानं लावून धरला. तर आम्ही कधीच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही, असा पाकिस्तानने कांगावा केला.
२०१३ मध्ये १४ दिवसांमध्ये ९ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानने केलंय. रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार, ही तर नित्याचीच बाब झालीय. २०१२ मध्ये पाकिस्ताननं तब्बल ११७ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. त्यामध्ये चार जवान शहीद झालेत तर तीन सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय. दोन भारतीय सैनिकांच्या निर्घृण हत्येनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलं आहे. यापुढे पाकिस्तानशी सुरळीत संबंध ठेवणं अवघड असल्याचं सिंग यांनी सांगितलंय तसेच दोन सैनिकांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना कठोर शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केलीय.

गेल्या सहा महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसऱ्यांदा फ्लॅग मिटींग झालीय. आता या फ्लॅग मीटिंगनंतर पुढे भारत सरकार नेमकी कोणती कारवाई करणार हाच खरा प्रश्न आहे. या प्रकरणावरुन राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला चांगलच धारेवर धरलंय.. पाकिस्तानसारख्या देशांशी संबंधच का ठेवावेत, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

व्हिडिओ पाहण्यासाठी - नवीन टॅब ओपन करून पुढील लिंक कॉपी-पेस्ट करा...
ना`पाक` इरादा... (भाग १) http://goo.gl/ReIRR
ना`पाक` इरादा... (भाग २) http://goo.gl/aQcp6
ना`पाक` इरादा... (भाग ३) http://goo.gl/OcyEc
ना`पाक` इरादा... (भाग ४) http://goo.gl/ULuqX
ना`पाक` इरादा... (भाग ५) http://goo.gl/t3ftY
ना`पाक` इरादा... (भाग ६) http://goo.gl/apLIH
ना`पाक` इरादा... (भाग ७) http://goo.gl/uKz3U

First Published: Tuesday, January 15, 2013 - 22:13
comments powered by Disqus