टपाल तिकिटावर तुमचाही फोटो असू शकतो...ते कसे?

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, November 21, 2013 - 23:49

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतातील असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतीय टपाल विभागानं अनेकदा टपाल तिकीटं काढली आहेत. सामान्य लोकांचीही अशीच टपाल तिकीटे निघावीत या हेतूनं टपाल विभागानं `माय स्टॅम्प` ही विशेष योजना सुरु केलीय. त्यावर तुमचाही फोटो असू शकतो, अशीच ही योजना आहे.
विलास खानोलकर यांना टपाल तिकीटे जमा करण्याचा छंद आहे. विविध प्रकारची जुनी टपाल तिकीटे त्यांच्या संग्रही असली तरी त्यांचा स्वत:चा फोटो असलेले टपाल तिकीट कधी निघेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. सचिनच्या अखेरच्या कसोटीनिमित्त काढलेली टपाल तिकीटे नेण्यासाठी ते सीएसटीच्या जीपीओमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना टपाल विभागानं सुरु केलेल्या `माय स्टॅम्प` या नव्या योजनेबद्दल समजले आणि त्यांनी लगेच आपला फोटो असलेली टपाल तिकीटे मिळवली.
`माय स्टॅम्प` ही सुविधा मुंबई जीपीओ आणि मुंबई एअरपोर्टवर सुरु कऱण्यात आलीय. यासाठी केवळ तीनशे खर्च येणार असून याबदल्यात तुमचा फोटो असलेली बारा टपाल तिकीटे मिळणार आहेत. टपाल तिकीटासाठीचा तुमचा फोटोही इथंच काढला जाईल. येत्या काही दिवसांत ही सुविधा गोवा, नागपूर, पुणे आणि औरंगाबादमध्येही सुरु केली जाणाराय. तर मार्च २०१४ पर्यंत राज्यातील २५ शहरांमध्ये ही सुविधा सुरु केली जाणार आहे.
इंटरनेटच्या या जमान्यात टपाल विभागाचे महत्व कमी होत आहे. अशावेळी लोकांना परत पोस्ट ऑफिसकडं वळविण्यासाठी आणि आपले उत्पन्न वाढविण्यासाठी टपाल विभाग असे नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ

First Published: Thursday, November 21, 2013 - 20:15
comments powered by Disqus