... अखेर सुशिक्षित पोतराजानं अंधश्रद्धेचं जोखड झुगारलं!

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, October 4, 2013 - 16:24

www.24taas.com
महेश पोतदार, झी मीडिया, उस्मानाबाद

वडिलांचा नवस फेडण्यासाठी, एका महाविद्यालयीन युवकाला, आपल्या जन्मापासून अपमानित जगणं जगावं लागलं. डोक्यावरचे केस वाढवून, अंगावर आसुडाचे फटके ओढत, असाह्यपणे दारोदार भिक मागत फिरावं लागलं. अंधश्रद्धेच्या या जोखडात अडकलेल्या एका पोतराजाची मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्यांनी मुक्तता केलीये. ‘झी मीडिया’चा हा विशेष वृतांत...

‘रामा झाडे’ला आता नवी ओळख मिळालीयं. त्याचं दिसणं, त्याचं असणं हे आता खऱ्या अर्थानं नवंच आहे. मानवी हक्क अभियान कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे, भीतीपोटी जोपासलेली अंधश्रद्धेची जळमट त्यानं कापून टाकली आहेत. गेल्या १८ वर्षांपसून तो हे अंधश्रद्धेचं ओझं डोक्यावर घेऊन वावर होता. महिलांप्रमाणे वेणी घालूनच त्याला कॉलेजला जावं लागायचं. त्यामुळे सतत त्याला अपमानित वाटायचं. ‘कॉलेजमध्ये गेलो की एकटाच बसायचो. केसांमुळे लाज वाटायची. कोणी जवळ येत नव्हतं. मित्र नव्हते. अभ्यासही करू वाटत नव्हता. केसांचं टेन्शन यायचं’ असं आपल्याबद्दल सांगताना रामा झाडे सांगतो.
सामान्य जगणं नाकारणारी ही पोतराज प्रथेची अंधश्रद्धा, पुत्रप्राप्तीच्या नवसापोटी काही मागासलेल्या समाजात आहे. एखाद्या कुटुंबात मुलगा होत नसेल तर नवसाने झालेल्या मुलाला देवीला सोडलं जातं. तोच हा पोतराज.. स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके ओढत... पोटाची खळगी भरण्यासाठी आत्मक्लेश करून घेत... असुडाच्या फटक्यांमुळे होणाऱ्या जखमाही, त्याला पोटभर अन्न देवू शकत नाहीत. त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा आणि देवीच्या कोपाच्या भीतीने पोतराजाला त्यातून बाहेरही पडता येत नाही.
‘माझ्या वडिलांना मुलगा होत नव्हता. म्हणून माझ्या वडिलांनी नवस बोलला होता की जो मुलगा होईल तो देवीला पोतराज म्हणून सोडला जाईल. म्हणून मी जन्मलो कि माझी केस वाढवली आणि पोतराज म्हणून सोडलं, वडिलांनी... पोतराज असणाऱ्या वडिलांसोबत बाहेर मागायला जातो, वाजवतो, प्रत्येकाच्या घरी जावून धान्य मागायचो’ रामा सांगतो.
केज तालुक्यातल्या नाहोली गावच्या रामा झाडेया बारावीत शिकणाऱ्या पोतराजाची कहाणी कळंबच्या ‘मानवी हक्क अभियान’च्या कार्यकर्त्याना मिळाली. या कार्यकर्त्यांनी अगोदर त्यांचे प्रबोधन केले. त्याच्या कुटुंबीयांच्या मनातील भीती दूर केली आणि रामाचे कळंबमध्ये केस कापले.
‘रामा अपमानित जीवन जगत होता. त्याने हे अपमानित जगण सोडावं म्हणून, त्याने उच्चशिक्षित व्हावं म्हणून आम्ही त्याला समजावण्याचं ठरवलं आणि त्याचे केस कापले... हीच आमची डॉ. नरेंद्र दाभोळकरांना आदरांजली असेल’ असं मानवी हक्क अभियाचे कार्यकर्ते बजरंग ताटे सांगतात.
रामाच्याच मागच्या वर्गात शिकणारा त्याचा भाऊ बालाजी झाडेही रामाच्या केस कापण्याच्या परिवर्तनशील उपक्रमाने आनंदित झालाय. तो सांगतो, ‘पूर्वी रामा खूप तणावात असायचा, केसं कापल्यावर आता खूश झालाय. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला स्पष्ट दिसतोय.’
अशिक्षित, गरीब आणि मागासलेल्या समाजात, अंधश्रद्धा, आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कोप होण्याच्या नावाखाली, चालत आलेल्या अनिष्ठ प्रथा मुळं, अनेक कुटुंबं, उध्वस्त होत आहेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, कायद्यासोबातच. प्रबोधनाची ही मोठी गरज आहे. सामजिक कार्यकर्त्यांनी, अशा प्रकारे पुढे येवून अंधश्रद्धेचे ‘केस’ कापायला हवेत तरच दक्षिण भारतातून आलेल्या या पोतराज प्रथेचं उच्चाटन होऊ शकतं.

व्हिडिओ पाहा :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, October 4, 2013 - 16:19
comments powered by Disqus