`अय्या`... घोर निराशा झाली गं बय्या!

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, October 12, 2012 - 17:44

www.24taas.com, मुंबई
मराठमोळा निर्माता सचिन कुडाळकर याचा ‘अय्या’ हा पहिला हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकलाय. सचिन कुडाळकर यांनी मराठी सृष्टीत ‘निरोप’ आणि ‘गंध’ या दोन चित्रपटांतून धडाकेदार एन्ट्री केली होती. आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकवलेल्या सचिन ‘अय्या’ या चित्रपटात मात्र आपली चमक दाखवण्यात थोडा कमी पडलेला दिसून आलाय. या चित्रपटाच्या पटकथेतच सचिनचा गोंधळ उडालाय. एका मराठमोळ्या मुलीची ही कथा स्क्रिनवर रेखाटताना मात्र तेवढ्या सक्षमतेनं आलेली नाही, हे सिनेमा पाहताना सारखं जाणवत राहतं. रिलीजपूर्वी करण्यात आलेली चित्रपटाची पब्लिसिटी बघून हा चित्रपट हिट होणार अशी अनेकांची अपेक्षा होती. पण ती साफ फोल ठरलीय.
‘अय्या’ चित्रपटाच्या मुख्य नायिकेची – मिनाक्षीची - भूमिका राणी मुखर्जीनं साकारलीय. बऱ्याच कालावधीनंतर राणीनं पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आगमन केलयं. सचिनच्या अय्या चित्रपटाची कहाणी एका मध्यमवर्गीय मुलगी आहे... पण, नेहमी स्वप्न पाहणारी, स्वतःच्याच दुनियेत रमणारी ही मराठमोळी मुलगी प्रेक्षकांना मात्र खूपच फिल्मी वाटली. काम करता करता मिनाक्षी एका साऊथ इंडियन मुलाच्या प्रेमात पडते. मात्र, तेव्हाच तिच्या घरची मंडळी तिच्यासाठी नवरा मुलगा शोधत असतात. हाच सगळा लग्नासंबंधी न समजणारा गोंधळ शेवट पर्यत चालू राहतो.
‘अय्या’ चित्रपटात राणीने मिनाक्षीची भूमिका तशी चोख सांभाळली आहे, पण अभिनय करताना थोडा अतिरेक झाल्यासारखा वाटतो. हिंदी चित्रपटात पहिल्यांदा पर्दापण करणारा साऊथ हिरो पृथ्वीराज सुकुमारनला सिनेमात मोजकेच संवाद मिळाल्यानं त्याचा अभिनय फारसा पाहायला मिळालेला नाही. अभिनेत्री केंद्रीत असा हा सिनेमा दिसून येतो. चित्रपटात वापरण्यात आलेली मराठी आणि दाक्षिण्य भाषेची भेळ प्रेक्षकांना सहज समजेल. अमित त्रिवेदींनी सिनेमाला संगीतबध्द केलं असून, प्रेक्षकांनी सिनेमाच्या गाण्यांना चांगलाच प्रतिसाद दिलाय. ‘ड्रिमम वेकपम’ हे गाण सध्या जोरात गाजतयं, तसंच राणीच्या ‘अगं बाई’ हे गाण्यावर तर कोणीही ताल धरेल. राणीचा बॅले डान्स मात्र कौतुक करण्याजोगता आहे. तिच्या चाहत्यांना तिच्या वेगळ्या अभिनयाचे पैलू पाहायला मिळतील. पटकथा नीट कळत नसल्याने चित्रपट पाहताना कंटाळा येऊ शकतो. ‘अय्या’ हा चित्रपटात बघण्यासारखे नक्की काय आहे? याचा उलगडा प्रेक्षकांना थिएटरमधून बाहेर पडेपर्यंत आणि नंतरही होत नाही. त्यामुळे या आठवड्यात सिनेचाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.

First Published: Friday, October 12, 2012 - 17:24
comments powered by Disqus