प्रेरणेच्या ट्रकवर धावणारा ‘भाग मिल्खा भाग’,

मिल्खा सिंग धावपटूमधील प्रसिद्ध नाव. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ आज प्रदर्शित झालाय.

Updated: Jul 12, 2013, 05:57 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
मिल्खा सिंग धावपटूमधील प्रसिद्ध नाव. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ आज प्रदर्शित झालाय. मिल्खा यांना मिळालेले यश हे काही सहजासहजी मिळालेले नाही त्यासाठी त्यांना अपार कष्ट घ्यावे लागलेत. त्यांचे संघर्षमय जीवन साकारणारा असा हा चित्रपट आहे.
इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या जीवनातील वास्तव साकारलं आहे फरहान अख्तर याने. खरंतर या भूमिकेसाठी अक्षय कुमारला विचारण्यात आलं होत. परंतु स्क्रीप्ट वाचून मात्र त्याला मिल्खा सिंगचे व्यक्तिमत्व साकारण्यास पुरेसा वेळ नसल्याने त्याने ते नाकारले. त्यानंतर ही भूमिका फरहान अख्तरला देण्यात आली आणि त्याने त्याला पुरेपूर न्याय दिला. उत्तम प्रकारे फरहाननेही भूमिका साकारलीय. त्याने जीव ओतून केलेला अभिनय यात पुरेपूर दिसून येतो.
कथानक
१९४७ ला भारताचे विभाजन झाले त्याच्या झळा अनेक लोकांनी सोसल्यात. यातील एक म्हणजे मिल्खा सिंग ज्याने कर्तृत्वाच्या जोरावर इतिहास निर्माण केला. मिल्खा सिंगचे कुटुंबीय भारताच्या विभाजनावेळी बळी पडले. हा क्षण त्याच्या जीवनातील मोठा कठीण प्रसंग होता. त्याच्या वडिलांनी म्हटलेले शब्द कायम त्याच्या स्मरणात राहिले आणि ते म्हणजे भाग मिल्खा भाग. ह्याच शब्दाने त्याला यशस्वीतेच्या इतक्या उंचीवर नेऊन ठेवले.
कथानकाला सुरुवात होते रोमपासून. १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये विजेच्या वेगाने धावत असलेला मिल्खा एक क्षण पाठी वळून बघतो काय आणि त्याचक्षणी नशीबाची साथ सुटते. यानंतर सुरु होतो मिल्खाच्या जीवनाचा प्रवास. यादरम्यान त्याला बऱ्याच सुखदुःखाचा सामना करावा लागतो. मिल्खा सिंग(फरहान अख्तर)चे कुटुंब भारताचे विभाजनावेळी बळी पडते. या विभाजनाच्यावेळी दिल्लीला पोहोचलेल्या मिल्खा सिंगला योगायोगाने रिफ्यूजी कँपमध्ये त्याची बहिण भेटते. दिल्लीतील बहिणीकडे राहत असताना त्याला निर्मल कौर(सोनम कपूर) या मुलीशी प्रेम होते.तिच्या सांगण्यावरुन आणि आयुष्यात काही बनण्याच्या इच्छेने तो सेनेत भरती होतो. सेनेचे प्रशिक्षक (पवन मल्होत्रा) त्याच्यातील अॅथलिटचे गुण ओळखतात. आणि त्यानंतर त्यांचे एकच ध्येय बनते ते म्हणजे एक चांगला अॅथलेट बनणे. त्याला हे स्वप्न पूर्ण करण्यास बरीच मेहनत घ्यावी लागली.
दिग्दर्शन
दिल्ली ६, रंग दे बसंती, अक्स या यशस्वी चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर यावर्षींचा राकेश मेहरा यांचा चित्रपट म्हणजे ‘भाग मिल्खा भाग. उत्तम दिग्दर्शन हे या चित्रपटाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर ५०-६०च्या दशकातील काळ साकारण्यातही राकेश मेहरा बऱ्याच प्रमाणात सफल राहिले. त्यांनी फारच सुंदर पद्धतीने हा काळ रेखाटलाय.
अभिनय
फरहान अख्तरने साकारलेली मिल्खा सिंग यांची भूमिका तर वाखाणण्याजोगी आहे. त्याने या भूमिकेसाठी घेतलेली पुरेपूर मेहनत या चित्रपटात दिसून येते. तसेच दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा आणि सोनम कपूर यांनीही उत्तम अभिनय करत या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा उचललाय.
संगीत
शंकर, एहसान आणि लॉय यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलयं. पार्श्वसंगीत तर फारच उत्तम आहे. यातील गाणी या चित्रपटाच्या वातावरणाला शोभणारी आहेत.

चित्रपट का बघावा?
हा चित्रपट अॅक्शनपट नाही की रोमान्सनी भरलेला नाही तरीही एका यशस्वी अॅथलिटच्या कारकिर्दीचा हा प्रवास नक्कीच आपल्याला प्रेरणा देऊन जातो.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.