दहशत ‘सीरियल किलर’ची...

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, June 19, 2013 - 09:07

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

तो अंधारातून येतो आणि पुन्हा अंधारात पसार होतो...मागे उरतो एक मृतदेह आणि एक दगड... हे कोल्हापूरातील वास्तव आहे आणि याचमुळे कोल्हापूरात सीरियल किलरची दहशत पसरलीय. यातील एका खुनाचा तपास लावण्यात पोलीस यशस्वी ठरले असले तरी इतर खुनांचं काय? हा प्रश्न मात्र कायम आहे.

गेल्या काही महिन्यात कोल्हापूरमध्ये खूनसत्र सुरु असून त्यामागे सीरियल किलर असल्याची भीती व्यक्त केली जातेय. शहरात एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत असताना पोलीस मात्र आकडेवारी कमी करण्यात धन्यता मानत आहेत.
> तारीख : १३ मार्च २०१३... ठिकाण - रेल्वे स्टेशन परिसर (कोल्हापूर)... डोक्यात दगड घालून खून
> तारीख : १९ मार्च २०१३... ठिकाण - रेल्वे स्टेशन परिसर (कोल्हापूर)... डोक्यात दगड घालून खून
> तारीख : २ मे २०१३... ठिकाण - बस स्टँड परिसर ( कोल्हापूर)... डोक्यात दगड घालून खून
> तारीख : २३ मे २०१३... ठिकाण - पोस्ट कार्यालय परिसर (कोल्हापूर)... डोक्यात दगड घालून खून
> तारीख : १३ जून २०१३... ठिकाण - बस स्थानक (कोल्हापूर)... युवकाचा खून
> तारीख : १५ जून २०१३... ठिकाण - पारीख पूल ( कोल्हापूर)... डोक्यात सीमेंटची वीट घालून खून
कोल्हापूरातील वेगवेगळ्या ठिकाणी या खूनाच्या घटना घडल्या असल्या तरी या सहा घटनांमध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे खून करणाऱ्या व्यक्तीनं हत्यार म्हणून वीट किंवा दगडाचा वापर केलाय. रस्त्याच्याकडेला फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तींना त्यानं टार्गेट केलं असून हे सगळे खून एकाच पद्धतीने करण्यात आले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात सीरियल किलरची दहशत निर्माण झालीय. गेल्या काही महिन्यात कोल्हापूरात खूनाच्या नऊ घटना घडल्या आहेत. त्यापैकी तीन प्रकरणात पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद केलीय. एकापाठोपाठ एक खूनाच्या घडत असताना पोलिसांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. सीरियल किलिंगच्या चारचं घटना घडल्या आहेत, असं पोलीस अधिक्षक विजय सिंह जाधव यांनी म्हटलंय.
सीरियल किलरने केवळ चार खून केल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी कोल्हापूरात नऊ खून झाल्याचा दावा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केलाय. कोल्हापूरातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे खूनाचं सत्र सुरु आहे. विशेष म्हणजे शाहुपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर या खूनाच्या घटन घडल्या आहेत. एकापाठोपाठ एक खून करुन सीरियल किलरने पोलिसांना जणू आव्हानचं दिलंय. या खून सत्राममागे एखादा माथेफिरु असावा असा संशय व्यक्त करण्यात आला असून काही महिन्यांपूर्वी मिरजमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे मिजरचा सीरियल किलर कोल्हापूरात तर आला नाही ना, अशी शंका व्यक्ती केली जातेय.

‘स्टोन मॅन’ची नागरिकांत दहशत आणि पोलिसांचा तपास फोल
सीरियल किलरला जेरबंद करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय. अनेक क्लुप्त्यांचा वापर केला मात्र तो काही त्यांच्या हाती लागला नाही. धक्कादायक बाब म्हणजे शाहुपुरी पोलीस ठाण्यापासून हकेच्या अंतरावर या खूनाच्या घटना घडल्यामुळे सामान्य नागरीक चांगलेच धास्तावलेत.
१९८० च्या दशकात मुंबईत सीरियल किलर स्टोन मॅनची मोठी दहशत होती. फुटपाथवर झोपलेल्या लोकांचा डोक्यात दगड घालून त्याने एकापाठोपाठएक खूनसत्रचं आरंभलं होतं. ‘स्टोन मॅन मर्डर्स’ हा चित्रपट त्यावरच आधारीत होता. मात्र, रुपेरी पडद्यावरची कहाणी जेव्हा वास्तवात येते तेव्हा समाज हादरुन जातो. कोल्हापूरातील नागरिक सध्या अशाच एका ‘स्टोन मॅन’च्या भीतीच्या छायेत जगत आहेत. गेल्या तीन महिन्यापासून कोल्हापूरात खूनाचं सत्र सुरु असून पोलीसांच्या हाती अद्यापही कोणतेच धागेदोरे लागले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणात भिकारी, फिरस्ते आणि तृतिय पंथींकडे चौकशी केली पण त्यातून त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. हे खूनसत्र रोखण्यासाठी पोलिसांनी कोल्हापूरातील भिकाऱ्यांची रवानगी इतर शहरात केलीय. शाहुपुरी पोलीस ठाण्यापासून हकेच्या अंतरावर हे खूनसत्र सुरु असून ते रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याचं चित्र आहे.
सीरियल किलरचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अनेक क्लुप्त्या वापरुन बघितल्या. रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला, गस्त वाढवली पण त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.

First Published: Wednesday, June 19, 2013 - 09:06
comments powered by Disqus