पागल लोकांचं गाव!

अमरावती जिल्ह्यातल्या एका गावात एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय. आठराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात 50 मनोरुग्ण आहेत. भयंकर प्रकार म्हणजे त्यांना एकतर साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं किंवा खोलीत कायमचं कोंडलं जातंय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 4, 2012, 11:39 PM IST

www.24taas.com, अमरावती
अमरावती जिल्ह्यातल्या एका गावात एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय. आठराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात 50 मनोरुग्ण आहेत. भयंकर प्रकार म्हणजे त्यांना एकतर साखळदंडांनी बांधून ठेवलं जातं किंवा खोलीत कायमचं कोंडलं जातंय... या मनोरुग्णांसाठी स्थानिक डॉक्टरांनी शिबिर घेतलं असलं, तरी अधिक व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे...
अमरावतीपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेले वडुरा हे नांदगाव-खंडेश्वर तालुक्यातलं गाव... बाहेरून हे गाव अन्य गावांसारखंच दिसत असलं, तरी वडु-यात सुमारे 50 मनोरुग्ण आहेत.. या मनोरुग्णांना साखळदंडांनी बांधून ठेवलेलं असतं. अनेकांना कायमस्वरुपी एका खोलीतच कोंडलेल्या अवस्थेत राहावं लागतंय...
अतिशय कमी लोकसंख्या असताना मनोरुग्णांची इतकी मोठी संख्या धक्कादायक आहे... हे प्रमाण बुचकळ्यात टाकणारं असल्याचं गावातल्या सरकारी डॉक्टरांचं म्हणणं आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या या बातमीत गावाचा उल्लेख `पागल लोकांचं गाव` असा करण्यात आल्याबद्दल इथं नाराजी असली, तरी मनोरुग्णांचं इथलं प्रमाण जास्त असल्याचं गावकरीही मान्य करतात.

मनोरुग्णांचं जास्त प्रमाण ही जशी एक समस्या आहे, तसंच या मनोरुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि उपचारांचा आभाव ही अडचणही मोठी आहे... या दोन्ही प्रश्नांची उत्तर सुसंस्कृत म्हणवणा-या समाजाला लवकरात लवकर शोधावी लागतील...