व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, May 23, 2013 - 19:23

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं कोकण टुरिझमसाठी घेतलेल्या सव्वा सहा कोटी रुपये किंमतीच्या पाच व्होल्वो बसेस बेस्टच्या आणिक बस आगारात धूळ खात पडून आहेत. जनतेचा पैसा पाण्यात कसा घालवला जातो. त्याचे हे एक उदाहरण.
मोठा गाजावाजा करत पर्यटनमंत्री छगन भुजबळांनी डिसेंबर 2012 मध्ये कोकण टुरिझमसाठी एमटीडीसीच्या पाच व्होल्वो बसेसना हिरवा झेंडा दाखवला. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत रंगारंग सोहळा झाला, पर्यटनवाढीची भाषणेही झाली. परंतु गेल्या सहा महिन्यांत या बसेसनी कोकण तर सोडाच मुंबईची हद्दही ओलांडली नाही. एमटीडीसीनं खाजगी टूर ऑपरेटर्सच्या मदतीनं `कोकण रॉयल` ही पर्यटन यात्रा करण्याचं ठरवलं. याकरीता एका बससाठी सव्वा कोटी याप्रमाणं सव्वा सहा कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक अशा 5 व्होल्वो बसेस खरेदी केल्या. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या बसमध्ये केमिकल टॉयलेट, वायफाय, फ्रीज, ओव्हन, कॉफी मेकर अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या. परंतु ही बसखरेदी करताना कोकणातील अरुंद आणि नागमोड्या वळणांच्या रस्त्यांचा कोणताही विचार एमटीडीसीनं केला नाही. त्यामुळं कोणीही खाजगी टूर ऑपरेटर्स या बसेस चालवण्यासाठी पुढं येतं नसल्याचं समजतंय. याबाबत एमटीडीसीच्या अधिका-यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देवून खाजगी टूर ऑपरेटर्सकरिता नवीन टेंडर काढलं असल्याचं सांगितलं.

गेल्या 6 महिन्यांचे सव्वा सहा कोटींवरील व्याज आणि बसेसच्या मेंटेनंन्सचा विचार करता सुमारे 30 ते 35 लाखांचा तोटा एमटीडीसीला झालाय. हे सहा पांढरे हत्ती खरेदी करण्यामागे एमटीडीसीच्या अधिका-यांचे कुठले आर्थिक गणित होते. याची चर्चा आता सुरु झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013 - 19:10
comments powered by Disqus