पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, June 9, 2013 - 18:53

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
धर्मेंद्र, सनी आणि बॉबी हे तिघे देओल पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. आणि आधीच्या `यमला पगला दिवाना`चा दुसरा भाग `यमला पगला दिवाना २` हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. हा भाग पहिल्या सिनेमापेक्षा धमाल आहे.
या सिनेमातही धरम (धर्मेंद्र) आणि गजोधर (बॉबी देओल) लोकांना ठगणारे चोर योगराज खन्ना (अन्नू कपूर) या युकेमधील बिझनेसमनला भेटतात. योगराजची मुलगी सुमन (नेहा शर्मा) हिच्याशी लग्न करण्यासाठी गजोधरचे प्रयत्न सुरू असतात. तेव्हा पलविंदर सिंगशी (सनी देओल) त्यांची गाठ पडते. युकेमध्ये कर्ज वसूली करणारा पलविंदर योगराजच्या क्लबमध्ये मॅनेजरचं काम करू लागतो. यावेळी त्याची भेट रीत (क्रिस्टिना अखीवा) हिच्याशी होते आणि तो प्रेमात पडतो. आपले वडील आणि भाऊ बनारसमध्ये सभ्य लोकांचं जीवन जगत असल्याचं वचन न पाळता युकेमध्ये फसवणूकीचा उद्योग करत आहे, हे पलविंदरला दिसतं. आणि त्यानंतर धमाल सुरू होते. यात कॉमेडी आहे, ऍक्शन आहे, नाच- गाणी आहेत आणि तिन्ही देओल्सची धमाल आहे.
अर्थात, कथेमध्ये अनेक ट्विस्ट्स आहेत. योगराजला फसवण्यासाठी आलेल्या धरम आणि गजोधरला नवनव्या गोष्टी समजत जातात. योगराजचा बिझनेस आधीच बुडीत असणं, सुमन ही योगराजची खरी मुलगी नसणं, रीत योगराजची खरी मुलगी असणं, अशा अनेक गोष्टी या सिनेमात घडत जातात. सिनेमाचं दिग्दर्शन संगीत सिवनने केलं आहे. गाणी टिपीकल पंजाबी लहेजातील आहेत. सिनेमात धरमेंद्र आणि सनी-बॉबी या तिघांनी धमाल उडवून दिली आहे. सोबतीला अन्नू कपूर आणि जॉनी लिव्हरसारखे विनोदवीर आहेत. त्यामुळे या सिनेमाला विशेष कथा नसूनही हा सिनेमा धमाल वाटतो. डोकं बाजूला ठेवूनच बघण्यासारखा हा सिनेमा आहे. त्यामुळे टाइम पास म्हणून हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 9, 2013 - 18:53
comments powered by Disqus