स्पॉट फिक्सिंगः राज कुंद्राची चौकशी

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, June 5, 2013 - 19:43

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची सट्टेबाजी आणि आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज चौकशी केली.
दिल्ली पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणी राजस्थान रॉयल्सचे खेळाडू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या तीन खेळाडूंना अटक केलेली आहे. यातील अंकित चव्हाण हा लग्नासाठी सहा जूनपर्यंत जामीनावर बाहेर आहे.
दिल्ली पोलिसांनी या तिन्ही खेळाडूंसह अटक करण्यात आलेल्या बुकींवर `मोक्का` अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांच्या बेकायदा कृत्यांना राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू आणि सट्टेबाजांनी सहकार्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता यांना वर्षभर जामीन मिळणे कठीण आहे.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकता नाईट रायडर्स संघांच्या प्रशासनातील अनेकांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर येत असल्याने दिल्ली पोलिसांकडून आता संघ मालकांचीही चौकशी करण्यात येत आहे. यामुळेच राज कुंद्रा याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013 - 19:43
comments powered by Disqus