महामोदकानं ‘ग्राहक बाप्पा’ प्रसन्न...

गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ठिकठिकाणी मोदक बनवले जातात. पण शहापूर तालुक्यातल्या आसनगावमध्ये ‘फूड हब’नं तब्बल पाच फुटांचा महामोदक बनवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 25, 2012, 03:26 PM IST

www.24taas.com, शहापूर
गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ठिकठिकाणी मोदक बनवले जातात. पण शहापूर तालुक्यातल्या आसनगावमध्ये ‘फूड हब’नं तब्बल पाच फुटांचा महामोदक बनवलाय.
हा महामोदक पंचक्रोषित आकर्षणाचा विषय ठरलाय. ११०० किलो वजनाचा हा मोठा मोदक सध्या मुंबई-नाशिक महामार्गावरच्या प्रवाशांचं मुख्य आकर्षण ठरतोय. शहापूरजवळच्या आसनगावमध्ये नव्यानंच सुरू झालेल्या ‘फूड हब’मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. किशोर पुरोहित, छगन पुरोहित आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दोन दिवस मेहनत घेऊन हा भला मोठा मोदक बनवलाय. हा मोदक बनवण्यासाठी ६०० किलो साखर, ३०० किलो तूप आणि ३०० किलो बेसन लागलं. त्यामध्ये १० किलो बदाम, पिस्ते, काजू यांचाही वापर करण्यात आलाय. पाच फूट उंचीचा हा मोदक बनवण्यासाठी १ लाख २५ हजार एवढा खर्च आलाय. या महामोदकामुळे बाप्पा खूश होवो अगर न होवो पण या फूड हबवर ‘ग्राहक बाप्पा’ मात्र प्रचंड खूश आहे.