उद्धव ठाकरे परदेशात, राज ठाकरे `शिवसेना भवना`त!

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, September 17, 2013 - 23:17

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत... हाच मौका साधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चक्क शिवसेना भवनाचा दौरा केला... राज ठाकरेंच्या या शिवसेना भवनाच्या दौ-याचा हा स्पेशल रिपोर्ट...
दादरच्या शिवसेना भवनासमोर अचानक करड्या रंगाची मर्सिडीज येऊन उभी राहिली... आतून राज ठाकरे खाली उतरले... आणि एकच धावपळ सुरू झाली... राज ठाकरे शिवसेना भवनावर धडकल्याचे वृत्त दादर परिसरात वा-यासारखं पसरलं... पत्नी शर्मिला ठाकरे या देखील त्यांच्यासोबत होत्या... नव्या शिवसेना भवनाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे शिवसेना भवन पाहत होते... शिवसेना भवनात बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो पाहताना राज ठाकरे जुन्या आठवणींमध्ये रमून गेले... बाळासाहेबांच्या फोटोंकडे पाहत त्यांनी पत्नी शर्मिला यांना काही जुने संदर्भही सांगितले... तब्बल 15 मिनिटे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना भवनाचा फेरफटका मारला.... विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. बहुतेक हीच संधी साधून राज ठाकरे शिवसेना भवनात गेले असावेत, अशी अटकळ बांधायला सुरूवात झाली...
पण हे शिवसेना भवन म्हणजे शिवसेनेचे खरेखुरे मुख्यालय नव्हे. तर दादरच्याच सेना भवनापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या राम मारूती गणेशोत्सव मंडळाने साकारलेला हुबेहुब देखावा होता. शिवसेना भवनाची ही सेम टू सेम प्रतिकृती पाहून राज ठाकरेंचा चेहराही खुलला होता... मायकल जॅक्सनसोबतचा बाळासाहेबांचा फोटो इथं का नाही, अशी विचारणाही त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केली....
शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर राजकीय मर्यादांमुळे राज ठाकरेंना शिवसेना भवनात जाता येत नाही... त्यामुळंच की काय प्रति शिवसेना भवनात जाऊन त्यांनी आपली हौस भागवून घेतली... आता केवळ लांबूनच आपल्या विठ्ठलाचे दर्शन न घेता, राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाचा उंबरठा देखील ओलांडावा, अशी तळमळ कदाचित जुन्या शिवसैनिकांना लागली असावी...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 17, 2013 - 23:14
comments powered by Disqus