बाप्पा निघाले गावाला...चैन पडेना आम्हाला!

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, September 18, 2013 - 07:48

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आपल्या भक्तांच्या घरी ११ दिवस राहिल्यानंतर आज गणपती बाप्पा आपल्या गावाला निघाले आहेत. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. घरगुती बाप्पांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केलीय.
मुंबईतही गणेश विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. सर्व चौपाट्यांवर मोटारबोट, तराफे, लाइफगार्ड, फ्लडलाइटसह विविध सुविधा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. सोबत हजारो कर्मचाऱ्यांचा ताफाही सज्ज ठेवला आहे.
दीड दिवसांच्या विसर्जनप्रसंगी गिरगाव चौपाटीवर भाविकांना स्टिंगरे माशांचा दंश झाल्यानं खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य सेवेला अॅलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माशांच्या दंशावरील उपचारासाठी गिरगावसह सर्व चौपाट्यांवर वैद्यकीय सेवा सज्ज असून, आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवला आहे. गिरगाव इथं पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी १०० गमबुट आणि १० हातगाड्यांची व्यवस्था केली आहे. अतिरिक्त दोन तराफे, दोन बोटी, १५ लाइफगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई प्रमाणे पुण्यातही मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. मिरवणूक पाहण्यासाठी जाताना अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचं सर्वांनी पालन करण्याची विनंतीही महापालिकेकडून करण्यात आली आहे. शिवाय घाटांवरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. शहरातील १७ घाटांवर १०२ जीवरक्षक आणि जवान उपस्थित असतील.
दरम्यान, गणरायाला निरोप देण्यासाठी पाऊसही येण्याची शक्यता हवामानखात्यानं वर्तवलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Wednesday, September 18, 2013 - 07:48


comments powered by Disqus