अबब..जगातली सर्वात मोठी अगरबत्ती

जगातली सर्वात मोठी अगरबत्ती न्यूयॉर्कमध्ये बनवण्यात आलीय.. आतापर्यंत गिनीज बुकातील तब्बल १६३ विक्रम नावावर असलेले अशरीता फरमन आणि त्यांच्या २० मित्रांनी मिळून ही अवाढव्य अगरबत्ती तयार केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 7, 2013, 11:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जगातली सर्वात मोठी अगरबत्ती न्यूयॉर्कमध्ये बनवण्यात आलीय.. आतापर्यंत गिनीज बुकातील तब्बल १६३ विक्रम नावावर असलेले अशरीता फरमन आणि त्यांच्या २० मित्रांनी मिळून ही अवाढव्य अगरबत्ती तयार केली आहे.
खास गोव्याहून न्यूयॉर्कला गेलेल्या निखील दिवेकर या मराठी तरूणाचाही या विक्रमात मोलाचा हातभार लागला आहे. जगातली सगळ्यात मोठी अगरबत्ती. नाग चंपा अगरबत्ती. न्यूयॉर्कमध्ये राहणारे ५८ वर्षांचे अशरिता फरमन आणि त्यांच्या २० मित्रांच्या टीमने १३ दिवसात ही महाकाय अगरबत्ती बनवली. त्यासाठी चंपा फुलाचं तेल आणि चंदन वापरण्यात आलंय.
चंपा तेल आणि चंदनाचे लेप एकावर एक लावून आणि ते सुकवून ही ९.६४५ मिमी उंचीची अगरबत्ती तयार केलीय. जवळपास दीड लाख साध्या अगरबत्त्या एकत्र जमा केल्या, तर एवढी मोठी अगरबत्ती बनू शकते. ही अगरबत्ती बनवण्यासाठी निखील दिवेकर या मराठी तरूणानेही हातभार लावला आहे. सुगंधी द्रव्य तज्ज्ञ असलेले निखील दिवेकर त्यासाठी खास पणजीहून न्यूयॉर्कला गेले होते.
जगातील सर्वात मोठी अगरबत्ती बनवण्याचा हा विक्रम करणारे अशरिता फरमन म्हणजे एक वल्लीच आहे. गिनीज बुकात त्यांच्यावर नावावर थोडेथोडके नव्हे तर तब्बल १६३ विक्रमांची नोंद आहे. जवळपास ४७२ वेळा त्यांनी स्वतःचेच विक्रम मोडलेत. फरमन हे भारतीय वंशाचे आध्यात्मिक शिक्षक श्री चिन्मय यांना गुरू मानतात. श्री चिन्मय यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्तच अगरबत्ती बनवण्याचा विक्रम करण्यात आला, असं फरमन यांनी सांगितलं.
फरमन यांचा उत्साह अजूनही कमी झालेला नाही. अजून नवनवे विक्रम घडवण्याची त्यांची इच्छा आहे. माणसाची शक्ती अमर्याद आहे. मनात आणलं तर आपण काहीही करू शकतो, हेच त्यांना जगाला सांगायचंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ