धक्कादायक: मोदी गेल्यानंतर सपानं पुतळा धुतला!

By Aparna Deshpande | Last Updated: Thursday, April 24, 2014 - 17:27

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी आज वाराणसीत वेगळाच रंग पाहायला मिळाला. सोबतच इथं एक राजकीय नाट्यही घडलं. मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बीएचयूमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर काही वेळातच समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी निषेध करत पुतळा गंगाजलनं धुतला.
सकाळी वाराणसी विमानतळावर उतरल्यानंतर मोदी हेलिकॉप्टरनं बीएचयूला पोहचले. त्यानंतर मोदींनी मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. मोदी आणि भाजपचे कार्यकर्ते रोड शोमध्ये गेल्यानंतर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांनी पुतळा गंगाजलनं धुतला.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही मोदींच्या बीएचयूला जाण्यावर आक्षेप घेतला होता. `मनद मोहन मालवीय यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं कोणत्याही राजकीय नेत्याची आणि पोलिसांवर बीएचयूमध्ये येण्याची वेळ येऊ दिली नव्हती. पण मालवीय यांच्या आदर्शांची खिल्ली उडवत मोदी जात आहेत`, अशी टीका केजरीवाल यांनी बुधवारी केली होती.
एकंदरीत आता सपा कार्यकर्त्यांच्या या प्रकारानंतर काय घडतं पुढे, निवडणूक आयोग काही कारवाई करतं का हे पाहावं लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 24, 2014 - 17:27
comments powered by Disqus