ऑडिट मतदारसंघाचं : मावळ

ऑडिट मतदारसंघाचं : मावळ

Updated: Apr 4, 2014, 04:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मावळ
मावळ हा मतदारसंघ जो निम्मा ग्रामीण आणि निम्मा शहरी असा आहे. 2008 च्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेला हा नवा मतदारसंघ.
2008 च्या पुनर्रचनेनंतर तयार झालेला हा मावळ लोकसभा मतदारसंघ. पुणे आणि रायगड जिल्ह्याचा निम्मा भाग जोडून तो तयार झालाय. पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले कर्जत, उरण आणि पनवेल असे तीन विधानसभा मिळू्न तयार झालेला हा मतदारसंघ. भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास हा मतदारसंघ मुंबईच्या लगत आहे.
 
हा भाग विविधतेने नटलाय, पिंपरी चिंचवडचा भाग औद्योगिक तर मावळ भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. कर्जत, उरण आणि पनवेल हे कोकणाचं प्रतिनिधित्व करणारे विभाग. पिंपरीतलं मोरया गोसावी मंदिर राज्यातल्या गणेश भक्तांच श्रद्धास्थान तर लोणावळ्याजवळची एकवीरा देवी अनेकांचं कुलदैवत. 
लोकांना आकर्षित करणारी लोणावळा-खंडाळा ही पर्यटनस्थळं, कार्ल्याची प्रसिद्ध लेणी याच मतदारसंघात आहेत. मतदारसंघात 60 टक्के लोकं ग्रामीण भागात राहतात तर उरलेले 40 टक्के निमशहरी आणि शहरी भागात राहतात.
 
2009 च्या लोकसभा निवडणुकीत एकुण 16 लाख 4 हजार 886 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 8 लाख 50 हजार 972 होती तर 7 लाख 53 हजार 917 महिलांनी मतदान केलं होतं.
 
2009 मध्ये नव्यानंच तयार झालेल्या मावळ मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. मतदार संघातल्या जिल्हा परिषदा असोत, वा पंचायत समित्या, राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व याठिकाणी आहे. परंतु इथला खासदार मात्र शिवसेनेचा आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसला आता हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणायचा आहे. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी तुल्यबळ रंगतदार लढत इथं पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या
मावळ मतदारसंघाला विविध समस्यांनी ग्रासलंय. खासदार गजानन बाबर यांचा पिंपरी चिंचवडवर प्रभाव असल्यानं हा भाग वगळता मतदारसंघातील अन्य विभाग दुर्लक्षितच राहिले. खासदार बाबर यांनी कोणत्याही स्थानिक समस्येसाठी रस्त्यावर उतरण्याचं धोरण ठेवलं. आणि नेमकी हीच बाब त्यांच्यावर टीकेसाठी कारणीभूत ठरली. गजानन बाबर यांनी स्थानिक प्रश्नांकडे अधिक लक्षं देताना, केंद्रात जे प्रश्न उपस्थित करणं आवश्यक होतं, त्या प्रश्नांकडे आणि समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता केला जातोय.
मुंबई, लोणावळ्याला जाण्यासाठी जादा ट्रेनची मागणी पिंपरी चिंचवडकर करतायत, पण बाबर यांनी त्याबाबत केंद्र सरकारकडं पाठपुरावा केला नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणारी अनेक घरं संरक्षण विभागाच्या हद्दीत अर्थात रेड झोनमध्ये येतात.
हा प्रश्न संरक्षण विभागाशी निगडीत असल्यानं गजानन बाबर यांनी तो दिल्लीत मांडणं आवश्यक होतं. पण तोही त्यांनी कधी  मांडला नाही. हिंजवडीजवळील आयटी पार्कमध्ये स्थानिक तरूणांना रोजगार मिळावा यासाठी ठोस पावलं उचलताना बाबर दिसले नाहीत. मावळ पाइपलाइन योजनेला असणा-या शेतक-यांच्या विरोधावर तोडगा शोधून काढण्याचा किंवा सुवर्णमध्य साधण्याचा साधा प्रयत्नही त्यांनी केला नाही, असा आरोप विरोधक त्यांच्यावर करतायत.
 
रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये तर खासदार बाबर यांच्यावर अधिकच टीका होतेय. बाबर यांनी या भागात रस्ता, रेल्वे, वीज अशा कोणत्याही प्रश्नाला हात घातला नाही. आदिवासी भागात ते फिरकलेच नसल्यानं आदिवासी लोकांच्या जमिनीसंदर्भातला प्रश्न असो, वा इतर गोष्टी, बाबर त्याबाबतीत अनभिज्ञ असल्याची टीका त्यांच्यावर  होतेय. 
 
गजानन बाबर हे मावळचे नाही तर केवळ पिंपरी चिंचवडचे खासदार आहेत, अशी उपरोधिक टीका त्यांच्यावर होते. स्वत: बाबर मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. खासदार निधी पूर्णपणे खर्च केल्याचं सांगताना, संसदेत प्रश्न विचारण्यात नंबर वन असल्याचंही ते सांगतात.
गजानन बाबर यांच्या कार्याचा आढावा घेतला तर त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला हे मान्य करावं लागेल. पण केंद्र सरकारशी निगडीत एकाही प्रश्नावर त्यांनी तोडगा काढलेला नाही. रायगडमध्ये तर ते क्वचितच फिरकले असं जनतेचं मत आहे. त्यामुळं बाबर हे केवळ पिंपरी चिंचवड पुरतेच मर्यादित राहिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
गजानन बाबर यांची ओळख
नाव - गजानन धर्मशी बाबर
जन्म - १ मार्च १९४३
वय - ७० वर्षे
शिक्षण - मॅट्ट्रीक