आपच्या बेशिस्तीनं मुंबईकर त्रस्त!

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, March 12, 2014 - 15:32

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मुंबईतली रिक्षातली सवारी आणि लोकलवारी चांगलीच चर्चेची ठरली. केजरीवाल सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीहून विमानानं आले. त्यानंतर त्यांनी थेट रिक्षातून अंधेरी स्टेशन गाठलं. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही रिक्षातूनच आले खरे मात्र यावेळी त्यांनी सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यानं काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.
त्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह लोकलमधून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी चर्चगेट लोकल पकडली. मात्र केजरीवाल यांना विंडो सीट मिळाल्यानं त्यांना लोकलच्या रोजच्या गर्दीतून प्रवासाचा अनुभव मात्र घेता आला नाही. मात्र त्यांच्या लोकलच्या प्रवासामुळं कार्यकर्त्यांची गर्दी झाली आणि मुंबईकर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळं केजरीवालांची मुंबईतली सफर मुंबईकरांना सफर करून गेल्याचंच दिसलं.
केजरीवाल यांनी मुंबईत आल्यानंतर वाहतूक नियमांची ऐशीतैशी करून टाकलीय. मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते रिक्षातून अंधेरी स्टेशनकडे निघाले. मात्र या प्रवासामध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवले. रिक्षाला लटकत कार्यकर्त्यांनी प्रवास केला. एकेका रिक्षामध्ये पाच-पाच कार्यकर्ते बसले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचीही पार वाट लागली. आता आपवर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. वाहतुकीची शिस्त मोडणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांवर खरोखरच कारवाई होणार का, असा सवाल मुंबईकर करत आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या रिक्षा आणि लोकलमध्या प्रवासाचा मात्र गोंधळ चर्चगेट स्टेशनवर दाखल झाल्यानंतरही कायम होता. चर्चगेट स्टेशनवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा यंत्रणा धाब्यावर बसवली. केजरीवाल स्टेशनच्या बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाली. स्टेशनच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले मेटल डिटेक्टर पायदळी तुडवले. त्यामुळं चर्चगेट स्टेशनवरील सुरक्षेचे तीनतेरा वाजले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Wednesday, March 12, 2014 - 15:26


comments powered by Disqus