काँग्रेस करणार मंथन, राहुल गांधींचं भविष्य ठरणार?

नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची आज बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीये.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 19, 2014, 09:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची आज बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीये.
काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पक्षसंघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.
महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी राहुलऐवजी प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर दिली जावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहे.
नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात होणाऱ्या बैठकीत गरमागरम चर्चा होणार असल्याचं समजतंय. निवडणुकीत पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीस स्वतः राहुल गांधी जबाबदार असल्याचं काही ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. देशातील पक्षाच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याबरोबरच एकमेकांवर पराभवाचे खापर न फोडता आणि तोच तोच मुद्दा उगाळत न बसता सर्वांनी पुन्हा एकदा कामाला लागण्याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचंही बोललं जातंय.
दरम्यान, निवडणुकीत अनेक दिग्गज काँग्रेस मंत्र्यांचा जो पराभव झाला आहे, त्यास ते स्वतः जबाबदार आहेत. पक्ष, कार्यकर्ते आणि मंत्र्यांमध्ये संवादाचा अभाव होता आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, हेही महत्त्वाचं कारण असल्याचं एका ज्येष्ठ नेत्याचं म्हणणं आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली व्यतिरिक्त फक्त एकाच जागेवर यश मिळवता आलं. त्यातही या दोन्ही मतदारसंघात प्रियांका गांधींनी केलेल्या प्रचाराचा फायदा झाला. त्यामुळे आता प्रियांका गांधींनी पक्षासाठी पूर्ण वेळ काम करावं अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. अलाहबादमध्ये प्रियांकाच्या पोस्टर्सनी सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.