सुषमा स्वराज - भाजपमधील धगधगतं महिला नेतृत्व

सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 07:41 PM IST

सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व. २००९मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या जागी त्यांनी लोकसभेचं विरोध पक्षनेते पद सांभाळलं.
जन्म - १४ फेब्रुवारी १९५२ला अंबाळा इथं झाला. त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली.
सुषमा स्वराज यांनी १९७७ ते ८२ आणि १९८७ ते ९० सालापर्यंत हरियाणा विधानसभेच्या आमदार म्हणून काम केलं. १९७७-७९ दरम्यान सुषमांनी हरियाणा सरकारमध्ये विविध मंत्रीपदं सांभाळली. १९९०मध्ये सुषमा स्वराज यांची पहिल्यांदा राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठीही त्या उमेदवार होत्या.
१९९६मध्ये सुषमा स्वराज पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. ११व्या लोकसभा निवडणुकीत १६ मे-१ जुन १९९६ दरम्यान त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं.
सुषमा स्वराज या प्रामुख्यानं समोर आल्या, जेव्हा त्या १९९९मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात निवडणुकीत उभ्या राहिल्या. ही निवडणूक त्या हरल्या. त्यानंतर २००४मध्ये जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसनं पुढं आणलं तेव्हा सुषमा स्वराज यांनी त्याचा खूप विरोध केला. देशातील सर्वोच्च स्थानी जर परदेशी महिलेला बसवलं तर स्वत:ला बोडकं करणार... सुषमा स्वराज यांच्या या धमकीनंतर देशात एक मोठं नाट्य घडलं होतं.
सुषमा (५८) यांनी मिझोरमचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांच्यासोबत विवाह केला. कपाळावरील मोठी लाल टिकली, भांगामध्ये सिंदूर, मोठ्या काठांची कॉटनची साडी आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ही सुषमा स्वराज यांची ओळख निर्माण झाली. आपल्या वक्तृवानं सुषमा भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचवतायेत.
लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनाही पंतप्रधानपदाचं स्वप्न पडलंच. सुरुवातीला त्यांनीही पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाचा विरोध केल्याचीही चर्चा आहे. जर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीला मॅजिक फिगर गाठता आलं नाही तर पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव पुढं येण्याची शक्यता आहे, जे की एनडीएतील मोदी विरोधी पक्षांना मान्य असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.