वाराणसीत निवडणूक आयोगाविरोधात भाजपचा ‘सत्याग्रह’ सुरू

वाराणसीतल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये धरणं आंदोलन करतायत. तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर न्यायमार्च काढण्यात आलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 8, 2014, 01:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी/नवी दिल्ली
वाराणसीतल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये धरणं आंदोलन करतायत. तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर न्यायमार्च काढण्यात आलाय. `वाराणसीत राहुल गांधींच्या सभांना परवानगी मिळते पण मोदींच्या सभेला का नाही?` असा सवाल उपस्थित करत भाजप नेत्यांनी दिल्ली आणि वाराणसीत आंदोलन सुरू केलं आहे. अरुण जेटली, अमित शहाही आंदोलनासाठी वाराणसीमध्ये पोहोचलेत.
वाराणसीत होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रॅफिक बदललंय. बनारस विश्व हिंदू विद्यालयाच्या लंका गेटच्या दिशेनं जाणारे रस्ते बंद करण्यात आलेत. वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना अटकही होऊ शकते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीत कलम १४४ लागू करण्यात आलंय. बनारस हिंदू विद्यापीठाच्या बाहेर रॅपिड एक्शन फोर्सही तैनात करण्यात आलाय. आज वाराणसीत मोदींचा रोड शो होणार असून या रोड शोच्या निमित्तानं जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.
`१९५२ पासून आतापर्यंत कधीच कुठल्या उमेदवाराला निवडणुकीत सभेसाठी परवानगी नाकारली गेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोग भाजपबरोबर पक्षपात करतोय`, असा आरोप अरूण जेटलींनी केलाय. `वाराणसीत निःपक्ष निवडणूक होण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याची बदली करा`, अशी मागणी जेटली यांनी केलीय.
वाराणसीत मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमा झाल्याने काहीशी चिंताजन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढे काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
तर दिल्लीत भाजपनं न्याय मार्च केला. भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू, मुख्तार अब्बास नकवी, डॉ. हर्षवर्धन सहभागी झाले होते.
विरोधांकडून टीका
 भाजपच्या वाराणसी आणि दिल्लीतील आंदोलनावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जोरदार टीका केलीय. भाजप घाबरले असल्यामुळेच अशा पद्धतीनं आंदोलनाचा आधार घेतंय. त्यांचं हे आंदोलन केवळ नाटक असल्याची टीका केलीय.
 समाजवादी पार्टीचे नेते राजेंद्र चौधरी यांनी अमित शहांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत निवडणूक आयोगानं कोणाच्याही दबावाखाली काम करू नये असं म्हटलंय.
 बसपा अध्यक्षा मायावती यांनीही भाजपच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. भाजपचं हे आंदोलन केवळ नौटंकी असल्याचं मायावतींनी म्हटलंय. तसंच सपा आणि भाजपचं साटंलोटं असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.