लालकृष्ण अडवाणी रुसलेत अन्...

भाजपमध्ये नरेंद्र मोदी फिवर असताना दिल्लीत मात्र, अस्वथ आहे. दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घराचे उंबरठे भाजपचे वरिष्ठ नेते झिजवत असल्याचे दिसून आले आहे. अडवाणी ज्या ठिकाणांहून आतापर्यंत निवडून येत आहेत तेथून निवडणूक लढण्यास त्यांनी चक्क नकार दिलाय. परंतु भाजप त्याच जागेवर अडून बसले आहे. त्यामुळे अडवाणी रुसून बसलेत. त्याचा रुसवा काढण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2014, 02:18 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भाजपमध्ये नरेंद्र मोदी फिवर असताना दिल्लीत मात्र, अस्वथ आहे. दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घराचे उंबरठे भाजपचे वरिष्ठ नेते झिजवत असल्याचे दिसून आले आहे. अडवाणी ज्या ठिकाणांहून आतापर्यंत निवडून येत आहेत तेथून निवडणूक लढण्यास त्यांनी चक्क नकार दिलाय. परंतु भाजप त्याच जागेवर अडून बसले आहे. त्यामुळे अडवाणी रुसून बसलेत. त्याचा रुसवा काढण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.
गांधीनगर. लालकृष्ण अडवाणी यांचा हा मतदार संघ. आजतागायत गांधीनगर या मतदार संघाचे नेतृत्व अडवाणी करत आले आहेत. तेथून ते सहज विजयी झाले आहेत. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना हा मतदार संघ नको झाला आहे. त्यांना तो सुरक्षित वाटत नाही. गांधीनगर हा गुजरातमधील मतदार संघ आहे. गुजरात म्हटले की, नरेंद्र मोदी समिकरण आले. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात आहे. त्याच मोदींच्या राज्यातील मतदार संघ अडवाणींना नकोय. म्हणजे मोदींवरच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा विश्वास नाही, हेच यातून सूचीत होते. हे भाजपला निवडणुकीसाठी धोक्याचे ठरू शकते. गांधीनगर नाकारणे ही भाजपची मोठी डोकेदुखी तर आहेच. मात्र, विरोधकांच्या हातात आयते कोलीत देण्यासारखे आहे. त्यामुळे भाजपची गोची झाली आहे.
अडवाणी ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना लोकसभेचे तिकिट देणे पक्षाला क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर करणे गरजेचेही होते. तशी उमेदवारी जाहीर झाली. गांधीनगरमधून उमेदवारी मिळाली आणि इथेच ठिणगी पडली. अडवाणींना मध्यप्रदेशमधील भोपाळची जागा हवी होती. त्यावर अडवाणी अडून बसले आहेत. त्यांचा रूसवा काढण्यासाठी आधी सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांनी भेट घेतली. त्याचा उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी सुषमा स्वराज, अरुण जेटली यांनी भेट घेतली. त्यानंतर सुमारे ५० मिनिटे भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवारी नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. त्यानंतर भाजपचे माजी अध्यक्ष व्यंकया नायडू यांनी भेट घेऊन चर्चा केली. तर फोनवरून राष्ट्रीय संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. तरीही अडवाणींचा रुसवा दूर झालाच नाही. त्यामुळे भाजपमध्ये तारांबळ उडाली आहे.
अडवाणी यांना गांधीनगर येथून मोदी पाडतील, अशी भिती आहे. त्यामुळे अडवाणी गांधीनगरमधून निवडणूक लढविण्यास राजी नाहीत. कारण मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यास आधी अडवाणी यांनी विरोध केला होता. याचा राग मोदी निवडणुकीतून काढतील, अशी अडवाणींची समजूत आहे. त्यामुळे अडवाणींना कोणताही धोका स्वीकारायचा नाही, अशी चर्चा आहे.
दरम्यान, विरोधकांनी अडवाणी यांच्या रुसव्यानंतर लगेच टीका करण्यासाठी संधी सोडलेली नाही. उस (भाजप) पार्टी में आग लगी हुई है. आपस में लढ रहें हैं. जनता देख रही हैं, अशी खोचक प्रतिक्रिया लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. तर भाजपचा खरा चेहरा सर्वांना दिसला आहे. अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि लालजी टंडन या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा पक्षात सम्मान होत नाही, हे यावरून दिसून येत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे तारिक अन्वर यांनी केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.