काँग्रेस प्रचारापासून मनमोहन सिंग लांबच

उगवत्याला नमस्कार करायचा, आणि मावळत्याकडे पाठ फिरवायची, राजकीय नेत्यांना हे मुळीच नवं नाही. असंच सध्या सुरू आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या सभा, रॅलींमधून राहुल गांधी, सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेते दिसतायेत. मात्र दहा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेले मनमोहन सिंग यांचा पत्ताच नाही. गेली दहा वर्षं ज्यांनी या देशाला सांभाळलं ते सिंग आज किंग राहिले नाहीत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2014, 09:46 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उगवत्याला नमस्कार करायचा, आणि मावळत्याकडे पाठ फिरवायची, राजकीय नेत्यांना हे मुळीच नवं नाही. असंच सध्या सुरू आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या सभा, रॅलींमधून राहुल गांधी, सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेते दिसतायेत. मात्र दहा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेले मनमोहन सिंग यांचा पत्ताच नाही. गेली दहा वर्षं ज्यांनी या देशाला सांभाळलं ते सिंग आज किंग राहिले नाहीत.
मनमोहन सिंग. गेली दहा वर्षं भारत देशाचं नेतृत्व करतायत. सोनिया गांधींनी अंतरात्म्याचा आवाज ऐकत २००४ साली मनमोहन सिंगांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पाच वर्षांत युपीएनं चमकदार कामगिरी केली आणि २००९ च्या निवडणुकीतही हेच सिंग किंग ठरले.
हजारो सवालोंसे अच्छी है मेरी खामोशी म्हणत त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. याच दहा वर्षांच्या काळात राहुल गांधी राजकारणात ब-यापैकी सक्रिय झाले आणि राज्याभिषेकाची स्वप्नं त्यांना पडू लागली.... आता २०१४ मध्ये काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वात प्रचाराचा जोरदार धुरळा उडवून दिलाय.
जागोजागी मै नही हम म्हणत राहुल गांधी कुठे शेतक-याच्या, कुठे विद्यार्थ्याच्या, कुठे महिला सक्षमीकरणासाठी महिलांबरोबरच्या पोस्टरमध्ये झळकतायत. सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचे मोठमोठे दावे काँग्रेस करतंय. पण या सगळ्यामध्ये भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंगांचाच हात काँग्रेसनं सोडून दिल्याचं दिसतंय. काँग्रेसची वेबसाईट बघितली तर राजधर्माचं पालन करा, हा सल्ला देणा-या वाजपयींचाच फोटो आधी दिसतो. त्यानंतर नावाला एक फोटो मनमोहन सिंगांचा लावण्यात आलाय. पण देशभर प्रचाराची राळ उठलेली असताना मनमोहन सिंगांचा चेहरा त्यात दिसत नाही.
एवढंच नाही तर काँग्रेस नेत्यांच्या भाषणातही त्यांचा साधा उल्लेखही नसतो. तेलंगणाचं बिल असो, अन्नधान्य सुरक्षेचं बिल असो, महिला आरक्षणाचं विधेयक किंवा लोकपाल विधेयक ही महत्त्वाची विधेयकं याच मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात संसदेत आली, याचा काँग्रेसला विसर पडला असावा.काँग्रेसमधल्या या लोकशाहीला काय म्हणावं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.