खबरदार, मतदान करताना `सेल्फी` काढलात तर...

मतदान करताना तुम्ही जर तुमचा `सेल्फी` काढण्याच्या विचारात असाल तर सावधान...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 19, 2014, 04:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या सेल्फीचं तरुण-तरुणींमधलं फॅड सोशल बेवसाईटवर स्पष्टपणे दिसून येतंय. सेल्फी म्हणजे आपणचं आपला फोटो काढायचा आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक करायचा... पण, मतदान करताना तुम्ही जर तुमचा `सेल्फी` काढण्याच्या विचारात असाल तर सावधान...
कारण, मतदान करताना जर आपला उत्साह `सेल्फी`च्या माध्यमातून तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला तुरुंगाची हवाही खायला लागू शकते.
१२ कोटी तरुण मतदारांची संख्या लक्षात घेत यंदा प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापरही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. प्रामुख्याने मतदानाची जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. काही सोशल वेबसाईटनी तर मतदान केल्यावर तसे फोटो पोस्ट करण्याचेही आवाहन केलंय. तुम्हीही आपले असे फोटो शेअर करू शकता. पण, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, मतदान केंद्राच्या आत प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी छायाचित्र काढणे हा `रिप्रेझेन्टेशन ऑफ पीपल अॅक्ट`चा भंग मानला जातो. तसेच, नियमानुसार मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर मोबाईल निवडणूक अधिकार्‍याकडे जमा करणे बंधनकारक आहे.
कायद्यातील या तरतुदीचा भंग झाल्यास थेट तीन महिन्यापर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. अनेकांनी मतदान केंद्राच्या आत केवळ छायाचित्रेच काढलेली नाहीत तर कोणत्या पक्षाला मतदान केले आहे, असे संकेतही त्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाहीत निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक असावी, या तत्वाचा हा भंग होत असल्यानेच निवडणूक आयोगाने या संदर्भात कडक सूचना जारी केल्या आहेत.
मात्र, मतदान केंद्राच्या बाहेर पडल्यानंतर मतदान केल्याचे बोटावरील शाईचे छायाचित्र काढून ते पोस्ट केल्यास त्याला कोणत्याही पद्धतीची हरकत नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.