ठाण्यासाठी राज धावले, नाशिकसाठी सेना धावणार?

ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असला. आणि महापौरपद शिवसेनेला मिळाले असले तरी या सगळ्यात खरे किंगमेकर ठरले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे.

Updated: Mar 6, 2012, 09:14 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असला. आणि महापौरपद शिवसेनेला मिळाले असले तरी या सगळ्यात खरे किंगमेकर ठरले ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्याची संधी असतानाही, शिवसेनाप्रमुखांचा आदर राखत त्यांनी ऐनवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळं आता नाशिक मनपात काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 

ठाणे महापौरपद निवडणुकीच्या काही तास आधी राज ठाकरेंनी आपले पत्ते उघड केले आणि ठाण्यात शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला. पळवापळवी आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत आपणच किंगमेकर असल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं आणि मनसेच्या स्थापनेनंतर प्रथमच शिवसेनेला थेट पाठिंबा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे तब्बल ७३ मतं मिळवून शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील विजयी झाले.

 

सत्तेसाठी आटापिटा करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आघाडीचीही सर्व मतं मिळवू शकले नाहीत. अर्थात राज ठाकरेंच्या या घोषणेआधी शिवसेना आणि मनसेत खलबतं झाली असणार हे स्पष्ट आहे. कारण शिवसेनेच्या तीन आमदारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन पाठिंब्याची मागणी केली आणि राज यांनीही पाठिंबा जाहीर करताना ठाण्यात सत्ता यावी ही तर शिवसेनाप्रमुखांची इच्छा असल्याचं आवर्जून नमूद केलं.

 

ही शिवसेना-मनसे युतीच्या पुढच्या समीकरणांची नांदी वगैरे नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं असलं तरी ठाण्यातल्या या नव्या ठाकरे पॅटर्नची चर्चा होणं स्वाभाविकच आहे.  यापूर्वी कल्याण डोंबिवलीसह काही ठिकाणी तटस्थ राहून शिवसेनेला साथ देणाऱ्या मनसेनं यावेळी थेट शिवसेना-भाजप युतीला मतदान केलं. शिवसैनिकांबरोबर मनसैनिकांचा जल्लोषही या निमित्तानं ठाण्यानं अनुभवला.

 

आता शिवसेना-भाजप युती नाशिकमध्ये मनसेला साथ देऊन त्याची भरपाई करू शकते. जुन्या शिवसैनिकांच्या ठाकरे जोडो अभियानाला यापूर्वी अपयश आलं, पण ठाण्यातल्या राजकीय परिस्थितीनं शिवसेना-मनसेला एकत्र आणलंच. ही नव्या समीकरणांची नांदी आहे काय ? पुढच्या काही काळात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का ?. या चर्चांना त्यामुळे उधाण येणार हे निश्चित.