'मनसे'तील बंड, अखेर झाले थंड

Last Updated: Saturday, February 4, 2012 - 22:26

www.24taas.com, मुंबई

 

दादरच्या बालेकिल्ल्यात मनसे आपली बंडाळी थोपविण्यात यश आलं आहे. बहुतांश बंडोखांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, तर उमेदवारीपासून डावलण्यात आलेले नाराज आता राजीखूशी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे पक्षनेत्तृत्वाचा टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला आहे.

 

शिवसेना आणि मनसेत झालेल्या बंडाळीमुळे दादर मधील वॉर्ड क्रमांक १८५ गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत होता. शिवसेनाभवन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेला वॉर्ड असल्यानं दोन्ही पक्षासाठी तो प्रतिष्ठेचा आहे. दोन्ही पक्षांना या वॉर्डावर आपलं वर्चस्व हवं आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून आपले उमेदवार घोषित झाल्यानंतर लागलीच त्याचे पडसाद उमटले. दोन्ही पक्षांमध्ये या वॉर्डातून उमेदवारीसाठी टोकाची स्पर्धा होती. या वॉर्डातून राज ठाकरेंनी संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिल्यानं तिथे शाखाध्यक्ष गिरीश धानुरकर, माजी विभागअध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. अगदी वॉर्डाच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यापर्यंत नाराजी व्यक्त झाली. मात्र आज राज ठाकरे यांना ही नाराजी थोपविण्यात यश आलं आहे. राज ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर आता या तिघांनीही झालं गेलं विसरुन देशपांडे यांच्या प्रचाराचं काम सुरु केलं आहे.

 

वरळीतलीही नाराजी दूर करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले आहेत. वरळीत वॉर्ड क्रमांक १८८ मध्ये रश्मी विचारे आणि वॉर्ड क्रमांक १८९ मध्ये दीपिका निकम यांनी बंडखोरी केली होती. त्यांचीही राज ठाकरे यांनी समजूत काढली आहे. त्यांनीही आपले अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे.

First Published: Saturday, February 4, 2012 - 22:26
comments powered by Disqus