मोदींच्या विजयात कोणती राज्य गेमचेंजर ठरली?

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विजयात मोठा वाटा आहे तो काही राज्यांमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयाचा.. पाहूयात ही कोणती राज्य गेमचेंजर ठरली ती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2014, 09:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विजयात मोठा वाटा आहे तो काही राज्यांमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयाचा.. पाहूयात ही कोणती राज्य गेमचेंजर ठरली ती.
* नवी दिल्लीच्या तख्ताचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो हे या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. वाराणसीतून निवडणूक लढवत नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचं वातावरण भगवं करुन टाकलं. गुजरातमधल्या संघटन कुशल अशा अमित शहा यांना वर्षभरापुर्वीच गुजरातची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी किती चोख काम केलं ते निकालवरुनच स्पष्ट होतं..

* उत्तरप्रदेशमध्ये एकूण जागा आहेत ८०.... भाजपला २००९ साली मिळाल्या होत्या केवळ दहा जागा... नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केलं आणि २०१४ मध्ये भाजपच्या जिंकल्या तब्बल 73 जागा... वाराणसीतून प्रचंड मतांनी निवडून आलेल्या नरेंद्र मोदींनी आपली ताकद उत्तर प्रदेशात दाखवून दिली.

* मोदी लाटेनं उत्तरप्रदेशमध्ये मायावतींच्या बहुजन समाज पार्टीची आणि मुलायमसिंह यांच्या समाजवादी पार्टीचीही धुळधाण केली. मायावतींच्या बसपाला एकही जागा मिळाली नाही. तर मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीला फक्त 5 जागा मिळाल्या.....त्याही त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडेच गेल्या.
उत्तरप्रदेशमधील नरेंद्र मोदींच्या घोडदौडीचा परिणाम शेजारच्या बिहारमध्येही पहायला मिळाला...

* बिहारमध्ये लोकसभेच्या जागा आहेत ४०. भाजपची २००९ सालची कामगिरी होती १२ जागांवर विजय.... मोदींच्या प्रभावामुळं २०१४ च्या लोकसभेत भाजपचे 31 खासदार विजयी झालेत.

* लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा साफ धुव्वा उडाला. पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि मुलगी मिसा भारती यांचा दारुण पराभव झाला. तर मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या जेडीयूचे केवळ दोन खासदार निवडून आले. जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

* राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे. २००९ मध्ये भाजपला इथं २५ पैकी केवळ ४ जागा मिळाल्या होता... मोदीच्या नेतृत्वाखाली भाजपनं राजस्थानमधील पैकीच्या पैकी म्हणजे सगळ्या २५ जागा जिंकल्यात. संपुर्ण राजस्थान भगव्या रंगात रंगून गेलाय...

* गुजरातमधून निवडले जातात २६ खासदार. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं १५ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये भाजपनं गुजरातमधील विरोधी पक्षच संपवून टाकलाय.. गुजरातमधील २६ पैकी २६ जागा भाजपनं जिंकल्यात. अवघा गुजरात मोदीमय झालाय.

* २९ खासदार संसदेत पाठवणारं मध्यप्रदेश हेही एक महत्वाचे राज्य. इथंही भाजपचं सरकार आहे. २००९ मध्ये जिंकल्या होत्या १६ जागा. २०१४ मध्ये भाजपनं जोरदार कामगिरी करत 27 जागा जिंकल्यात. तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ 2 जागा आल्यात.

* महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी लाटेनं काँग्रेस-राष्ट्रवादीचं पानिपत केलयं. ४८ पैकी भाजप-सेना युतीनं 2009 मध्ये २० जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये मोदी लाटेवर सेना-भाजप युतीचे 41 खासदार विजयी झालेत. भाजपचे खासदार ९ वरुन 23 तर शिवसेनेचे 11 वरुन 18 झालेत. राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला केवळ २ जागांवर विजय मिळालाय.
* नरेंद्र मोदींच्या लाटेनं जोरदार करामत केलीय.उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यांनी मोदी लाटेवर स्वार होत भाजपला भरभरुन मतदान केलयं...त्यामुळचं सत्तेची सगळी समिकरणच बदलून गेली आणि अबकी बार मोदी सरकार हे भाजपचं स्वप्न साकारलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.