उत्तर भारतीयच मुंबईवर 'ओझं'

अरविंद सावंत काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नागपुरात जाऊन मुंबईबद्दल जी बाष्कळ, अपरिपक्व आणि बेताल वक्तव्य केलं, त्याबद्दल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी चांगलंच कानफटवलं आहे.

Updated: Oct 25, 2011, 07:42 AM IST

अरविंद सावंत

शिवसेना उपनेते

काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नागपुरात जाऊन मुंबईबद्दल जे बाष्कळ, अपरिपक्व आणि बेताल वक्तव्य केलं, त्याबद्दल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना चांगलंच कानफटवलं आहे.   उत्तर भारतीयांनीच मुंबईचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं आहे, उत्तर भारतीयांनी काम थांबवलं तर मुंबई बंद पडेल अशा अर्थाचं निरुपम यांनी विधान केलं होतं.

 

मुळात संजय निरुपम यांच्याबद्दल इतकं बोलण्याची काही गरज नाही. सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक येत आहे. त्या आधी उत्तर भारतीय जनतेचे आम्ही कैवारी आहोत, हे दाखविण्यासाठी मुंबईतील काही उत्तर भारतीय नेत्यांमध्ये  चढाओढ सुरू आहे. त्याच एक भाग म्हणून निरूपम यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे.

 

ऐन दिवाळीत सणासुदीच्या दिवसात अशा प्रकारची बोंब मारून त्यांनी त्यांच्या लोकांना त्रास होईल याची व्यवस्था केली आहे. जो उत्तर भारतीय मुंबई महाराष्ट्रात आपल्या उपजिविकेसाठी आला आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अशा वक्तव्यांनी बदलतो. निरूपम म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ’ आहे. ते ज्या ठिकाणी गेले तिथे ते कुऱ्हाडीचे दांडेच राहिले. त्या पेक्षा त्यांचं काही कर्तृत्व नाही. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेसमध्येही पाठिंबा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनी निरूपम यांची पाठराखण केली नाही. त्यामुळे, निरूपम यांची ही वायफळ बडबड आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.

 

निरूपम यांनी असं वक्तव्य करून  संयुक्त महाराष्ट्राची चळवळीतील हुतात्मांचा आणि मराठी माणसाचा अपमान केला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आई ही आई असते आणि दायी ही दायी असते. दायी कधीही आईची जागा घेऊ शकत नाही. दायीचे आम्ही कौतुक करू पण तिला आईची जागा आम्ही कधीही देणार नाही.

 

निवडणुका तोंडावर आल्या असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेसचे हे गलिच्छ राजकारण आहे. असे गलिच्छ राजकारण खेळून ते मुंबई महापालिकेची सत्ता बळकवण्याचा विचार करीत आहेत. परंतु, त्यांचे हे मनसुबे मराठी माणूस कधीही पूर्ण होऊ देणार नाही.

 

मुंबईच्या बाबतीत सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे या शहरावर परप्रांतीय लोंढे धडकत आहेत. सर्व पक्षांनी राजकारण सोडून या परप्रांतीय लोंढ्यांना थांबविले पाहिजे. शहरातील मुलभूत सेवा सुविधांची क्षमता किती याचा विचार करून शहरावर बोजा टाकायला पाहिजे.

 

निरूपम म्हणतात, मुंबई शहराचे ओझे आमच्या खांद्यावर आहेत, पण मुंबईवर याच लोकांचे ओझे झाले आहेत. त्याचं काय?