राजकारण नको, मूल्यमापन करा...

Last Updated: Tuesday, October 25, 2011 - 11:07

सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

 

संजय निरुपम यांनी नागपूरमध्ये जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद मुंबईत उमटले. उत्तर भारतीय लोक हे मुंबईवरचं ओझं नसून उत्तर भारतीयांनीच मुंबईचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं आहे असं निरुपम म्हणाले होते. उत्तर भारतीयांनी काम थांबवलं तर मुंबई बंद पडेल अशा अर्थाचं विधानही त्यांनी केलं. यावर ठरल्याप्रमाणे शिवसेना, मनसेच्या लोकांनी आपल्या शैलीत कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली.

 

या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे, बाकी काही नाही. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं. निरुपम यांनी आम्ही मुंबई बंद पाडू असं अजिबात म्हटलेलं नव्हतं. काँग्रेसचे लोक कधीही मुंबई बंद पाडण्याची भाषा करत नाहीत. निरुपम म्हणाले होते की जर उत्तर भारतीयांनी काम थांबवलं... तर मुंबई बंद पडेल. यात खरंतर काहीच चूक नाही. मध्यंतरी मनसेने आंदोलन केलं आणि उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. त्यावेळी उत्तर भारतीय काम सोडून निघून गेले. त्याचा परिणाम असा झाला की मुंबईतला बांधकाम व्यवसाय ठप्प पडला. कारण, गवंडी काम करणाऱ्या लोकांमध्ये कुणी मराठी माणूस नव्हता, उत्तर भारतीय होते. दूधवाला, इस्त्रीवाला हे सर्व उत्तर भारतीयच तर आहेत.  आज मुंबईतले जवळपास अठ्ठेचाळीस व्यवसाय हे उत्तर भारतीयांच्या ताब्यात आहेत.

 

एवढे व्यवसाय त्यांच्या ताब्यात का गेले ? हे सर्व उद्योग मराठी माणसाने टाकून दिले होते. ते या उत्तर भारतीयांनी स्वीकारले. यात शिवसेना, मनसेसारखे पक्ष मराठी माणसाची दिशाभूल करत आहेत. शिवसेनेने तर गेले ४५ वर्षं शिवाजी महाराज आणि मराठी माणूस या दोन भावनिक मुद्दयांच्या आधारावर लोकांची माथी भडकवण्यापलिकडे काहीही केलं नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले २५ वर्षं शिवसेनेचंच राज्य आहे. इतक्या वर्षांत परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी काय केलं या लोकांनी ? ४५ वर्षं शिवसेना आणि गेले काही वर्षं मनसेसारखे मराठी माणसाचा तथाकथित ‘कैवार’ घेतलेले पक्ष सातत्याने रस्त्यावर उतरत असूनही मराठी माणसाच्या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही, मराठी माणसाचा प्रश्न काही सुटला नाही. यातच या पक्षांचा पराभव दिसून येतो. मनसे जेव्हा स्थापन झाली तेव्हा उत्तर भारतीयांचा मुद्दा त्यात कुठेच नव्हता. मात्र उद्धव ठाकरेंचं ‘उत्तरायण’ सुरू झाल्यावर ही उत्तर भारतीयांविरुद्धची ‘खळ्ळ् खट्याक’ची मोहिम सुरू झाली.

 

या सर्व प्रांतवादी राजकारणात काँग्रेसने मात्र नेहमीच सर्वसमावेशक, सर्वंकष विकासाची भूमिका घेतली आहे. संजय निरुपम यांचं वक्तव्य ही त्याचीच एक बाजू आहे. ‘मुंबई मराठी माणसाचीच’ असा नुसता हट्ट धरण्यात आणि त्यावर गलिच्छ राजकारण काही अर्थ नाही. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. इथले कारखाने, गिरण्या केव्हाच बंद पडल्या असून आता मुंबईत सर्व्हिस इंडस्ट्री सर्वत्र पसरली आहे. मुंबई चालते ती या सेवांवर. कॉर्पोरेट सेक्टर्स, कॉल सेंटर्स अशा अनेक नव्या इंडस्ट्रीज मुंबईत उभ्या राहिल्यावर इथे काम मिळवायला स्पर्धा निर्माण होणारच. अशावेळी फक्त आपण भूमीपुत्र आहोत एवढ्या एकमेव भांडवलावर काम मागण्यापेक्षा स्पर्धेला तोंड देऊन मराठी माणसाने आपलं अस्तित्व सिद्ध करायला हवं. ‘माझा अभ्यास तयार नाही, म्हणून मी आजचा पेपर सोडवणार नाही. उद्या येऊन पेपर सोडवेन.’ असा हट्ट धरून कोणी परीक्षा पास होत नाही. यामुळेच बाकीचे लोक पुढे गेले आणि मराठी माणूस मुंबई सोडून उपनगरांमध्ये गेला.

 

१६६९ पासून मुंबईचा जो विकास केला गेला, तो बहुतांश अमराठी लोकांनीच केला. १८५४ साली मुंबईत पहिली स्पिनींग मिल सुरू झाली. ती अमराठी उद्योजकाचीच होती. तेव्हा तिथे काम करायला मुंबईबाहेरून मराठी माणूस आला आणि वस्ती करू राहयला लागला. अगदी तसाच जसा आज महाराष्ट्राबाहेरून आलेला उत्तर भारतीय वस्ती करुन राहतो. परप्रांतीयांना दोष देण्यावूर्वी मराठी माणसाने आपलाही इतिहास तपासून पाहायला हवा. संजय निरुपम यांच्या विधानावर फक्त राजकारण करण्यापेक्षा त्यातलं तथ्य तपासून पाहावं. आपलं वागणं जोखावं आणि यथार्थ मूल्यमापन करून या स्पर्धात्मक जगात सर्वांसह आपला विकास साधावा.

शब्दांकन- आदित्य नीला दिलीप निमकर

 

First Published: Tuesday, October 25, 2011 - 11:07
comments powered by Disqus