संरक्षणदृष्ट्या प्रगती... भारताची आणि चीनची

गेल्या दहा वर्षात शस्त्रास्त्रे निर्मितीच्यादृष्टीने भारताची काहीही प्रगती झालेली नाही. भारत-चीन सीमेवरील रस्ते मूळ सीमारेषेपासून जवळपास ३०-४० किलोमीटर मागे आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 10, 2014, 04:39 PM IST

www.24taas.com,
माजी ब्रिगेडीअर हेमंत महाजन

रस्ते, रेल्वे लाईन, विमानतळे सक्षम करणे जरुरी
गेल्या दहा वर्षात शस्त्रास्त्रे निर्मितीच्यादृष्टीने भारताची काहीही प्रगती झालेली नाही. भारत-चीन सीमेवरील रस्ते मूळ सीमारेषेपासून जवळपास ३०-४० किलोमीटर मागे आहेत. म्हणजे शेवटचे सुमारे चाळीस किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागते. तेथे वाहाने पोहोचत नाहीत. तर दुसऱ्या बाजूला चीनच्या बाजूचे सर्व रस्ते सीमेपर्यंत पोहोचलेले आहेत. रस्ते बांधणीमध्ये आपण मागील दहा वर्षात ज्या प्रकारे मागे पडलो होतो त्यात सुधारणा करून आगामी काळात हे रस्ते सीमेपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.
चीनची रेल्वे लाईनसुद्धा तिबेटपर्यंत म्हणजे सीमेच्या खूप जवळ येऊन पोहोचलेली आहे. पुढील पाच वर्षात ती काठमांडूद्वारे नेपाळशीसुद्धा जोडली जाणार आहे. त्या तुलनेत आपली रेल्वेलाईन सध्या फक्त आसामपर्यंतच आहे. अरुणाचलचा जो डोंगराळ भाग आहे तिथे ती अजून पोहोचलेलीच नाही. तेव्हा ही रेल्वे लाईनही सक्षम करून ती डोंगराळ भागात पोहोचवली पाहिजे. कारण सैन्याला हालचाल करण्याच्या दृष्टीने याचे फार महत्त्व असते. दारुगोळा नेणे, सैन्य एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात नेणे, मोठाली शस्त्रास्त्रे हलविणे या सर्व कामांसाठी दळणवळणाची ही सोय अत्यंत आवश्यक आहे.
आपली रेल्वे लाईन दोन भागात विभागली आहे. एक ब्रह्मपुत्रा नदीच्या वरील भागातील आणि दुसरी ब्रह्मपुत्रेच्या खालची रेल्वे लाईन... हे दोन्ही भाग जोडले गेले पाहिजेत... त्यासाठी नदीवर चार पाच ठिकाणी मोठे पूल बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन भागांशी संपर्क राहू शकेल आणि आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवणं शक्य होऊ शकेल. शिवाय इथे पर्यायी दोन-तीन रेल्वे लाईन असाव्यात म्हणजे एक रेल्वे लाईन काही कारणांमुळे बंद पडली तर दुसरा पर्याय उपलब्ध राहू शकेल.

तिसरी महत्त्वाची गोष्ट, सीमेलगत आवश्यक असणारी विमानतळे होय. आपली सध्याची विमानतळे ही अत्यंत जुनाट आणि दुसऱ्या महायुद्धातील आहेत. १९४४ साली दुसरे महायुद्ध लढले गेले होते, तेव्हा ब्रिटिशांनी जी विमानतळे बांधली होती तीच अजूनही आहेत. चीनी एअरफोर्सचा मुकाबला करण्याच्यादृष्टीने विचार करता विमानतळांचे आधुनिकीकरण होणे गरजचे आहे. तसेच त्यांची संख्याही वाढविली पाहिजे. थोडक्यात रस्ते, रेल्वे लाईन आणि विमानतळे यांचे आधुनिकीकरण पुढच्या दहा वर्षात झालेच पाहिजे. कारण आपण चीनच्या तुलनेत खूपच जास्त मागे पडलेलो आहोत.
आणखी एक सुधारणेची गोष्ट म्हणजे ‘ऑईल पाईप लाईन’ होय. चीनने पूर्ण तिबेटमध्ये पाईपलाईन बांधून ठेवल्या आहेत. आपल्या मात्र तयार नाहीत. या आपण बांधल्या पाहिजेत. ही सुधारणा जशी चीनी सीमेवर आवश्यक आहे, तशीच पाकिस्तानलगतच्या राजस्थान आणि गुजरात सीमेवर होणे अपेक्षित आहे.
सैन्याच्या शस्त्रांचे आधुनिकीकरणही सुधारणे गरजेचे आहे. किमान चीन किंवा पाकिस्तानशी लढा देऊ शकू, अशा गुणवत्तेची शस्त्रास्त्रे आपल्याकडे असायला हवीत. यासाठी सर्वात मोठा प्रश्न आहे बजेटचा... त्यासाठी सरकारने संरक्षणासाठी निधी वाढविला पाहिजे. हा निधी आत्ता वाढवला म्हणजे किमान पुढच्या दहा वर्षात या गरजा पूर्ण होतील. अर्थात हे सरकार पाच वर्षे राहणार आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत ही सुरुवात होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आपण मागे राहू...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.