परराष्ट्रमंत्र्यांचं ‘पाक’प्रेम...

भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारे भयंकर करार का करत आहेत? त्यांनी वारंवार पाकचे दौरे का करावेत? पाकिस्तानने असे नेमके काय केले की परराष्ट्रमंत्र्यांना पाकिस्तानच्या ‘प्रेमा’चा पान्हा फुटावा?

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 13, 2012, 10:17 AM IST

ब्रिगेडिअर हेमंत महाजन
www.24taas.com, मुंबई
भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारे भयंकर करार का करत आहेत? त्यांनी वारंवार पाकचे दौरे का करावेत? पाकिस्तानने असे नेमके काय केले की परराष्ट्रमंत्र्यांना पाकिस्तानच्या ‘प्रेमा’चा पान्हा फुटावा? पाकिस्तानने २६/११च्या आरोपींना भारताच्या हवाली केले आहे का? कंदहार विमान अपहरणातील अतिरेक्यांचे प्रत्यार्पण केले केले आहे का? १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील ‘वॉण्टेड’ दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले की पाकिस्तानातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून त्यांचे पलायन रोखले? यापैकी काहीही घडले नसताना आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी शत्रू राष्ट्राचे उंबरठे झिजवण्याचे कारणच काय?
भारत-पाकची सीमाच त्यांनी सताड उघडी केली आहे. ३८ वर्षांपासून पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर असणारे कडक निर्बंध त्यांनी एका क्षणात रद्द करून टाकले. वाटेल तेव्हा भारतात या, व्यापार करा, पैसा कमवा आणि वाटेल तेव्हा पाकिस्तानात परत जा, अशी मोकळीकच परराष्ट्रमंत्री कृष्णा यांनी पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना दिली आहे. भारतात पर्यटनाला येण्यासाठीही पाकिस्तानी जनतेसाठी कृष्णा यांनी गालिचे अंथरले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांच्याशी परराष्ट्रमंत्री कृष्णा यांनी नवीन व्हिसा धोरणाचा धक्कादायक करारच केला असून त्यात व्हिसासाठी आवश्यक असणार्यार अनेक कडक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. कृष्णा यांच्या स्वाक्षरीनिशी करण्यात आलेल्या या करारानुसार अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांच्या आत पाकिस्तानच्या नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार आहे.
नव्या करारानुसार दहा किंवा त्यापेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक समूह भारतात येणार असतील तर त्यांना ‘खास’ पर्यटन व्हिसा दिला जाणार आहे. म्हणजे कसाबसारख्या अतिरेकी टोळ्यांना यापुढे समुद्रमार्गे लपून-छपून येण्याची गरजच भासणार नाही. भारतात एका रात्रीपुरते यायचे असेल तर झटपट ३६ तासांत व्हिसा देण्याची सोयही करण्यात आली आहे. लहान मुले आणि प्रसिद्ध उद्योजकांना तर भारतात आल्यावर पोलीस ठाण्यात माहिती देण्याचीही गरज नाही. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसाठी अतिरेक्यांनी लहान मुलाचा मानवी बॉम्ब म्हणून वापर केला होता, हे आपल्याला माहीत आहे ना! मागे विश्वकचषक स्पर्धेच्या वेळी पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिक क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी भारतात आले. त्यापैकी असंख्य पाकिस्तानी नागरिक पुन्हा त्यांच्या देशात परतलेच नाहीत. हे नेमके कुठे ‘अदृश्य’ झाले हे परराष्ट्रमंत्री कृष्णा यांना ठाऊक आहे काय? भारत आणि पाकिस्तानची सीमा जगातील सर्वात धगधगती आणि स्फोटक सरहद्द मानली जाते.

पाकिस्तानमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवायची गरज
सीमेवरून पाकिस्तान कित्येक वर्षांपासून भारतात अतिरेक्यांना घुसवतो आहे. प्राणांचे बलिदान देऊन आमचे जवान ज्या सीमेचे रक्षण करीत आहेत ती सीमाच शत्रू राष्ट्रासाठी खुली करून देण्याची कारवाई परराष्ट्रमंत्री कृष्णा यांनी केली आहे. जनतेने या देशविरोधी व्हिसा धोरणाला कडाडून विरोध करायला हवा! भारताला सदैव चर्चा आणि बोलण्यांमध्ये गुंतवून ठेवायचे आणि दुसरीकडे पाठीत सुरा खुपसून छुपे युद्ध छेडायचे हेच पाकिस्तानचे ‘परराष्ट्र धोरण’ आहे. भारताचे ७०,००० हून अधिक निरपराध लोक आणि जवान आजवर या छुप्या युद्धात मरण पावले. १९४७ चा कश्मीरचा युद्धविराम, १९६५ चा ‘ताश्कंद’चा करार, १९७१-७२ चा सिमला करार, लाहोर करारानंतर कारगिलचे युद्ध, आग्र्यातील बोलणीनंतर संसदेवर हल्ला हाच पाकचा खरा चेहरा आहे, हे वारंवार सिद्ध होऊनही भारतीय राज्यकर्ते पाकिस्तानच्या जाळ्यात पुन: पुन्हा सापडतात आणि भलते-सलते करार करून मोकळे होतात. दहशतवाद्यांना आमंत्रण देणारे नवे व्हिसा धोरण जाहीर करून परराष्ट्रमंत्री कृष्णा यांनीदेखील हीच चूक केली आहे.
आज पाकिस्तानमध्ये मुलकी शासन, लष्कर आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात वर्चस्वासाठी कडवा संघर्ष चालू आहे. याचा निकाल काय व कसा लागेल, यावर पाकिस्तानचे भवितव्य आणि दक्षिण आशियातील वातावरण अवलंबून राहील. अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेण्यासाठी आतूर झालेली अमेरिका, स्वतःचे संरक्षण करू पाहणारा भारत आणि आक्रमक चीन, हे सर्व पाकिस्तानातील घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत.