नजर तुझी ही जुल्मी गडे!

जगाकडे पाहण्याची त्याला समजावून घेण्याचा प्रयत्नात तुमचे डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, धकाधकीच्या जीवनात तुम्ही त्याच्याकडेच दुर्लक्ष करतात... नॉट फेअर! म्हणूनच या काही साध्या आणि सोप्या टीप्स तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 15, 2013, 08:35 AM IST

www.24taas.com, मुंबई
जगाकडे पाहण्याची त्याला समजावून घेण्याचा प्रयत्नात तुमचे डोळे महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, धकाधकीच्या जीवनात तुम्ही त्याच्याकडेच दुर्लक्ष करतात... नॉट फेअर! म्हणूनच या काही साध्या आणि सोप्या टीप्स तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी...
योग्य आहार
तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये थोडा बदल करून त्यात पोषक तत्वांवर अधिक भर द्या. उदाहरणार्थ विटॅमिन ए, सी आणि ई, झिंक, ओमेगा-३ अशी तत्व असलेल्या फळांचा-आहाराचा समावेश खाण्यात करा. यामुळे तुमची दृष्टी उत्तम राहू शकेल . वयपरत्वे निर्माण होणारे आजारही यामुळे तुमच्यापासून चार हात लांबच राहतील.
आता विटॅमिन ए, सी आणि ई, झिंक, ओमेगा-३ हे कोणत्या पदार्थांतून मिळतं? तर ते मिळतं... हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक, कोबी तसंच ऑइली फिश (सालमन आणि ट्युना), अंडी, आंबट फळं, गाजर, बटाटे यांसारख्या पदार्थांपासून...
कम्प्युटरवर काम करताना काळजी घ्या...
कम्प्युटरवर सलग तासन-तास काम केल्यामुळे डोळ्याला थकवा जाणवणं हा काही फक्त तुमचाच प्रॉब्लेम आहे... कम्प्युटरवर काम करणाऱ्या अनेकांना तो जाणवतो. कारण, या व्यक्ती सलग जास्त वेळेपर्यंत स्क्रीनवर पाहत राहतात. त्यामुळे त्यांना डोळ्यांवर ताण येणं, डोकं दुखणं, अंधुक दिसणं, थकवा जाणवणं, डोळे कोरडे पडणं, दूरवरच्या गोष्टींवर असलेल्या गोष्टींवर पटकन लक्ष न जाणं, मान-पाठ आणि खांदे भरून येणं अशा अनेक तक्रारी जाणवतात.
मग, कारण माहित असताना आपण त्याकडे दुर्लक्ष का करतो? तुमच्या स्क्रीनचा प्रकाश किती असावा हे तुम्हाला ठरवता येतं, तशी सेटींग कम्प्युटरवर करून घ्या. अँन्टी ग्लेअर स्क्रीनची आवश्यकता असल्यास तशी सुविधा उपलब्ध करून घ्या. भरपूर पाणी प्या आणि डोळ्यांची उघडझाप होईल याची काळजी घ्या त्यामुळे तुमचे डोळे कोरडे पडणार नाहीत. दोन-दोन तासानंतर का होईना पण कामातून छोटासा ब्रेक घ्या. स्क्रीनवरून नजर हटवून प्रत्येक २० मिनिटांनंतर कमीत कमी २० सेकंद तरी दूरवर पाहा. स्क्रीनच्या वरच्या भागाच्या लेव्हलवर तुमचे डोळे असतील अशी तुमच्या खुर्चीची उंची ठेवा.
सनग्लासेस किंवा सेफ्टी गॉगल्स वापरा
उन्हात असताना यूव्ही किरणांपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी सनग्लासेस किंवा सेफ्टी गॉगल्स वापरा. यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून ९९टक्के संरक्षण करतील अशा गॉगल्सची निवड करा.धुळीच्या ठिकाणी सेफ्टी गॉगल्स वापरायचं विसरू नका.
धुम्रपान बंद
धुम्रपानाचा गंभीर परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो, हे अभ्यासातून आता स्पष्ट झालंय. धुम्रपान डोळ्यांसाठीही हानिकारक ठरतं.

जुनं मेक-अप सामान वेळीच काढून टाका
तुमच्या डोळ्यांना सुंदर दिसण्यासाठी तुम्ही जे काही कॉस्मेटिक्स वापरत असाल ती सहा महिन्यांपेक्षा जुनी नाहीत याची काळजी घ्या. असतील तर ती आत्ताच फेकून द्या. तुमचं मेक-अप किट आणि ब्रश इतरांबरोबर शेअर करू नका त्यामुळे तुम्ही डोळ्यांच्या इन्फेक्शनपासून दूर राहाल.
नियमित डोळ्यांची तपासणी करा
तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टर्सना नियमित हाय-हॅलो करा. म्हणजे तरी तुम्ही नियमितपणे जाऊन डोळे तपासून घ्याल. आणि डोळ्यांची काळजीही घ्याल.