'विवाहीत समस्यांसमोर लवकर टेकतात गुडघे'

तुम्ही याला दिवसेंदिवस बदलत जाणारा भारतीय समाज म्हणा... किंवा या समाजात घटत जाणारी व्यक्तिगत सहनशीलता... पण, विवाहसंस्थांच्या गाठी काहिशा सैल होत असल्याचंच सत्य एका अहवालातून समोर आलंय. 

Updated: Jul 17, 2014, 12:32 PM IST
'विवाहीत समस्यांसमोर लवकर टेकतात गुडघे'  title=
प्रातिनिधिक फोटो

इंदोर : तुम्ही याला दिवसेंदिवस बदलत जाणारा भारतीय समाज म्हणा... किंवा या समाजात घटत जाणारी व्यक्तिगत सहनशीलता... पण, विवाहसंस्थांच्या गाठी काहिशा सैल होत असल्याचंच सत्य एका अहवालातून समोर आलंय. 

‘एनसीआरबी’नं नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालात ‘जीवनातील नकारार्थी परिस्थितीसमोर गुडघे टेकून आत्महत्येचा पर्याय स्वीकारण्याची प्रवृत्ती विवाहीत लोकांमध्ये जास्त असल्याचं’ म्हटलं गेलंय.  

‘राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो’नं (एनसीआरबी) जाहीर केलेल्या अहवालानुसार, वर्ष 2014 मध्ये आपल्या जीवनाचा शेवट करताना स्वत:ला संपविणाऱ्यांमध्ये 69.4 टक्के लोक विवाहीत होते. तर, हेच प्रमाण अविवाहितांमध्ये 23.6 टक्के इतकं आढळलं. 

गेल्या वर्षी म्हणजेच 2012 साली 64,098 विवाहीत पुरुषांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला तर 29,491 विवाहित महिलांनीही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. एनसीआरबी अहवालानुसार, वर्ष 2013 मध्ये देशात एकूण 1,34,799 प्रकरणांची नोंद झाली होती. त्यात 21,062 विवाहित पुरुषांचा तर 10,766 विवाहीत महिलांचा समावेश आहे.

2012 साली आत्महत्येचा पाऊल उचलणाऱ्यांमध्ये 3.7 टक्के लोक विधूर किंवा विधवा होते. 2013 साली आत्महत्या करणाऱ्यांमध्ये घटस्फोटीत किंवा कोणत्या तरी कारणावरून आपल्या जीवनसाथीपासून  विलग राहणारे 3.2 टक्के लोकांचा समावेश होता.

या आकडेवारीचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, एनसीआरबीचे हे आकडे म्हणजेच देशात अविवाहितांपेक्षा विवाहितांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती जास्त असल्याकडे इशारा करतात. त्यामुळेच, बदलती सामाजिक, आर्थिक परिस्थिती पती-पत्नींमधली भावनात्मक ओढ कमी होत जाण्याचं दर्शवत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

आजकाल छोटं आणि एकेरी कुटुंबात राहणाऱ्या विवाहितांमध्ये व्यक्तिगत सहनशीलता खूप कमी झाल्याचं दिसतंय. त्यामुळे ते तत्कालिक कारणांनी अचानक भावनाविवश होत आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात... यावेळी ते आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही विसरतात, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. 

सध्या विवाहितांच्या आत्महत्येतील बहुतांश प्रकरणात असंही दिसून आलंय की, अशा व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही वयस्कर व्यक्तींशी आपल्या समस्या कथन न करताच आत्महत्येचं पाऊल उचललंय. जवळच्या नात्यांतील कमी होत जाणारा संवाद चिंताजनक प्रवृत्तीकडे इशारा करतोय, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.