कोच डंकन फ्लेचरची हकालपट्टी होणार?

वर्ल्डकप जिंकल्यानंतर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, फ्लेचर यांनी टीमची सूत्रं हाती घेतली आणि टीमच्या कामगिरीच्या आलेख खालावत गेला. यामुळेच आता कोच फ्लेचर यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 14, 2013, 07:36 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
वर्ल्डकप जिंकल्यानंतर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, फ्लेचर यांनी टीमची सूत्रं हाती घेतली आणि टीमच्या कामगिरीच्या आलेख खालावत गेला. यामुळेच आता कोच फ्लेचर यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे.
कोच डंकन फ्लेचर यांच्या रूपात टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा पहिला बळी जाण्याची शक्यता आहे. टीम इंडिया सध्या संक्रमणातून जात आहे. यातच टीम इंडियाची सध्याची कामगिरी अतिशय खराब होत आहे. यामुळेच आता बीसीसीआय काही कठोर निर्णय घेण्यासाठी सज्ज झालीय. बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीच्या मीटिंगमध्ये डंकन फ्लेचर यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांची हकालपट्टी निश्चित आहे. मार्च २०१३मध्ये फ्लेचर यांचा करार संपुष्टात येणार असून या कालावधीनंतर फ्लेचर अॅन्ड कंपनीला बाय-बाय करण्यात येणार आहे. डंकन फ्लेचर यांनी कोच म्हणून जेव्हापासून टीम इंडियाची सूत्रं हाती घेतली तेव्हापासून टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख दिवसेंदिवस खाली येतोय.

डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने आतापर्यंत २० टेस्ट खेळल्या असून यातील केवळ ६ टेस्टमध्येच टीम इंडिया विजय मिळवू शकलीय. विजय मिळवलेल्या ६ टेस्टमधील ५ टेस्ट या भारतात झाल्या आहेत. याशिवाय टीम इंडियाने आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४४ वन-डे खेळल्या आहेत. यातील २२ वन-डेमध्ये टीम इंडिया जिंकली असून यातील १० वन-डे या भारतात खेळल्या गेल्या आहेत. डंकन फ्लेचर यांना भारतीय क्रिकेटपटूंची मानसिकता लक्षात येत नसून ते ती जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत, अशी टीका त्यांच्यावर केली जात आहे. यामुळेच आता डंकन फ्लेचर यांच्यानंतर टीम इंडियासाठी भारतीय कोच नेमण्याबाबत विचार करण्यात येत आहे. आता डंकर फ्लेचर यांची हकालपट्टी निश्चित असून त्यांच्यानंतर कोण यावर सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.