टी-२०मध्ये भारताचीच बाजी

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, December 25, 2012 - 18:09

www.24taas.com, मुंबई
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट मुकाबला म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक मेजवानीच...टी-20मध्ये आतापर्यंत जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने आलेत तेव्हा-तेव्हा भारताने बाजी मारलीय.
क्रिकेटच्या रणांगणावर महायुध्द
भारत आणि पाकिस्तानमधील मुकाबला म्हणजे जणूकाही महायुद्धच...जेव्हा-जेव्हा हे पारंपारिक शत्रू आमने-सामने येतात तेव्हा-तेव्हा दोन्ही देशवासियांसाठी ती प्रतिष्ठेची लढाई असते. म्हणूनच भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटचा मुकाबला हा फायनल किंवा इतर कोणत्याही मोठ्या स्पर्धेपेक्षा महत्त्वाचा ठरतो. यामुळेच टी-20 महासंग्रामापूर्वी दोन्ही देशांमधील खुन्नस आपल्याला पहायला मिळणार आहे. इतिहासावर नजर टाकल्यास जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात मुकाबला झालाय तेव्हा-तेव्हा भारताने बाजी मारलीय.
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान दरम्यान तीन टी-20 मॅचेस खेळल्या गेल्या आहेत. यातील तिन्ही लढतींमध्ये भारताने विजय मिळवलाय. विशेष म्हणजे या तिन्ही लढती टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळल्या गेल्या आहेत. यातील 2007मध्ये झालेल्या पहिल्या-वहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान दोन मॅचेस झाल्या. या दोन्हीही लढतींमध्ये भारताने बाजी मारलीय. लीग मॅचमध्ये बोलआऊट मध्ये भारताने विजय खेचून आणला. तर रंगतदार झालेल्या फायनलमध्ये भारताने 5 रन्सने पाकिस्तानवर मात करत वर्ल्ड कपवर नाव कोरल. यानंतर झालेल्या दोन वर्ल्ड कपमध्ये एकदाही भारत-पाक मुकाबला झाला नाही. यानंतर 2012मध्ये श्रीलंकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने आलेल्या भारत-पाकिस्तानमध्ये भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.

2007च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकाच ग्रुपमध्ये असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील लीग मुकाबला फायनलपेक्षाही रंगतदार ठरला. टाय झालेल्या या मुकाबल्याचा निर्णय बोल आऊटमध्ये लागला. भारताकडून सेहवाग, भज्जी आणि उथप्पाने स्टंपचा अचूक वेध घेतला. तर पाकिस्तानकडून यासिर अराफत, उमर गुल आणि शाहीद आफ्रिदी यापैकी एकालाही स्टंपचा वेध घेता आला नाही.
तर रोमांचक ठरलेल्या फायनलमध्ये अखेरच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 13 रन्सची गरज होती. भारताकडून जोगिंदर शर्माने पहिल्या बॉल वाइट टाकला यानंतर दुसरा बॉलवर पाकला एकही रन घेता आली नाही. यानंतर जोगिंदरने टाकलेल्या फुलटॉसवर मिसबाह उल हकने एक शानदार सिक्स खेचला. त्यानंतर तिस-या बॉलवर मिसबाहने पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न केला मात्र बॉल श्रीशांतच्या हातात विसावला आणि अशा रितीने भारत जगज्जेता ठरला.

तर 2012 च्या टी-20वर्ल्ड कपच्या ग्रुप टूमध्ये भारताने पाकिस्तानच्या 129 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना 8 विकेट्सने विजय मिळवला. विराट कोहलीच्या 78 रन्सच्या नॉट आऊट खेळीने भारताने हा विजय साकारला.
आतापर्यंत वर्ल्ड कपमध्येच आमने-सामने येणारे हे पारंपारिक प्रतिस्पर्धी प्रथमच एकमेकांविरूद्ध सीरिजमध्ये टी-20च्या लढाईत उतरणार आहेत. म्हणूनच दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचलयी. आता या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहण रंगतदार ठरणार आहे.First Published: Tuesday, December 25, 2012 - 17:37


comments powered by Disqus