'आप'मधून भूषण, यादव यांची हकालपट्टी करा - ६० आमदार

प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची आता राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करणारं पत्र ६० आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलंय. दरम्यान, महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खळबळ उडवून दिलीय.

Updated: Mar 11, 2015, 08:51 PM IST
'आप'मधून भूषण, यादव यांची हकालपट्टी करा - ६० आमदार  title=

नवी दिल्ली : प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची आता राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करणारं पत्र ६० आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलंय. दरम्यान, महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खळबळ उडवून दिलीय.

होळी आणि रंगपंचमी आटोपली. मात्र आपमधील धूळवड अजून सुरूच आहे. राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टीमध्ये यादवी रंगलीय. तर महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खळबळ उडवून दिलीय.
 
दिल्लीतल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशानंतर आपमध्ये जोरदार उलथापालथ सुरू झालीय. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी आवाज उठवला. पक्षाच्या राजकीय कामकाज समितीतून दोघांची उचलबांगडी करण्यात आली. मात्र अजूनही केजरीवाल समर्थकांचं समाधान झालेलं नाही. 

येत्या २८ आणि २९ मार्चला आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होतेय. भूषण आणि यादव यांची आता राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करणारं पत्र ६० आमदारांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना पाठवलंय. केजरीवाल समर्थकांची अशी मोर्चेबांधणी सुरू असताना, योगेंद्र यादव यांनी मात्र सबुरीचा सल्ला दिलाय.
 
दरम्यान, मात्र आपमधील घमासान थांबण्याची चिन्हं दिसत नाहीयत. अरविंद केजरीवाल यांचंच एक स्टिंग ऑपरेशन पुढे आले आहे.  महाराष्ट्रातले आपचे नेते मयंक गांधी यांनी केजरीवालांच्या विरोधात टीकाटिप्पणी सुरू केलीय. तर आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिलीय. त्यामुळे आपबीती अशी स्थिती दिसत आहे.
 
मी पक्ष सोडतेय. या नॉनसेन्ससाठी मी पक्षात आले नव्हते. मी अरविंद केजरीवालांना तत्वांसाठी पाठिंबा दिला, घोडेबाजारासाठी नाही, असं ट्विट करत दमानियांनी पक्षाला गुडबाय केलं. खरं तर मोठ्या अपयशानंतर एखाद्या राजकीय पक्षाला गळती लागते. मात्र घवघवीत यश मिळाल्यानंतरही पक्षामध्ये उभी फूट पडावी, असं चित्र आपमध्ये दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.