अडवाणींना व्हायचं होतं किमान ६ महिने तरी पंतप्रधान!

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, June 11, 2013 - 15:58

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणींच्या राजीनाम्यामुळे नवा संघर्ष सुरू झाला आहे. मोदींचं वाढतं प्रस्थ हेच अडवाणींच्या राजीनाम्यामागचं कारण असावं, असंच दिसून येत आहे. अडवाणींच्या राजीनाम्यामागे आणखी एक कारण असल्याचा खुलासा झाला आहे.
ज्या दिवशी नरेंद्र मोदींना भाजपच्या निवडणूक प्रचार प्रमुखपदाची धुरा सोपवली गेली. त्याच दिवशी लालकृष्ण अडवाणींनी आपला राजीनामा लिहिला होता. पणजी येथील भाजपच्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. यामागचं कारण मोदींना देण्यात आलेलं महत्व हेच असावं. जर एनडीएचं सरकार सत्तेवर आलं, तर किमान ६ महिने तरी आपल्याला पंतप्रधानपद मिळावं, अशी अडवाणींची मागणी होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अडवाणींना एनडीएने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावं, अशी इच्छा होती. गेली अनेक वर्षं आपण भाजपसाठी काम करत असून आपल्याला पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे असं अडवाणींचं म्हणणं होतं. त्यांच्यानंतर भाजपच्या इतर कुठल्याही नेत्याला पंतप्रधानपद देण्यास त्यांची तयारी होती. निदान काही काळ तरी मोदींना अडवाणींच्या हाताखाली काम करावं, अशी अडवाणींची इच्छा होती.
सहा महिने पंतप्रधानपदी काम केल्यानंतर इतर कुणालाही पंतप्रधान केल्यास अडवाणींना आक्षेप नव्हता. मात्र रा.स्व.सं.च्या दबावाला बळी पडून भाजपने मोदींना प्रचार प्रमुखाचं स्थान दिल्यामुळे अखेर अडवाणींनी राजीनाम्याचं शस्त्र बाहेर काढलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013 - 15:54
comments powered by Disqus