आरोपांच्या फैरीत आता चौकशीचा फेरा

आरोपांच्या फैरी झाडून राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे केजरीवाल यांना सर्वपक्षीय विरोधाला सामोरं जावं लागत असतानाच आता आपल्या सहका-यांच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत. टीम केजरीवालचे सदस्य अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि मयांक गांधी यांची चौकशी होणार आहे. पक्षांतर्गत लोकपाल असलेल्या तीन निवृत्त न्यायाधिशांकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2012, 04:54 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
आरोपांच्या फैरी झाडून राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे केजरीवाल यांना सर्वपक्षीय विरोधाला सामोरं जावं लागत असतानाच आता आपल्या सहका-यांच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले आहेत.
चौकशी होणार
टीम केजरीवालचे सदस्य अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि मयांक गांधी यांची चौकशी होणार आहे. पक्षांतर्गत लोकपाल असलेल्या तीन निवृत्त न्यायाधिशांकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार आहे.
दरम्यान, जमीन खरेदीच्या वादाप्रकरणी अंजली दमानिया यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

एकीकडे आपल्या सहका-यांच्या चौकशीचे आदेश केजरीवाल देत असताना त्यांची पूर्वीश्रमीची टीम मात्र आपले पुढले डावपेच आखत आहे. अण्णा हजारे, किरण बेदी, अविनाश धर्माधिकारी, विश्वंभर चौधरी हे राळेगणसिद्धीतल्या या बैठकीला हजर आहेत.
गडकरींची पाठराखण
भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांप्रकरणी शिवसेनाप्रमुखांनी नितीन गडकरींची पाठराखण केली. सामना या मुखपत्रात त्यांनी ठाकरी शैलीत अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांचा समाचार घेतलाय.

जुनेच आरोप
वाय पी सिंग यांनी शरद पवार यांच्यावर केलेले आरोप जुनेच असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केलाय. लवासावर आपण यापूर्वीच बोलल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलय़.
पवारांकडून गडकरींचे समर्थन
टीम केजरीवालांकडून होणा-या टीकेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गडकरींचे समर्थन केलयं. लोकांच्या आयुष्यात चांगले बदल होणारी कामं करायची नाही का असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केलाय. अरविंद केजरीवाल यांनी गडकरींच्या साखर कारखाने आणि वीज प्रकल्पांच्या उभारणीवर केलेल्या टीकेच्या संदर्भात पवार यांनी ग़डकरींची पाठराखण केलीये. लोकहिताचे काम करीत असताना कोणीही टीका केली तरी चालेल असंही पवारांनी म्हटलयं.
लवासाचं समर्थन
लवासाचा घोटाळा नारायण राणे यांनी दडपल्याचा आरोप वाय. पी. सिंग यांनी केला होता. या आरोपांना नारायण राणेंनी उत्तर दिलयं. लवासा सिटीला परवानगी देतांना आपण जे काही केलं, ते कायद्यानुसार केलं आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे. आपण काहीही चुकीचं केलेलं नसल्याचं सांगून, राणे यांनी लवासाचं जोरदार समर्थन केलं आहे.